अनधिकृत बागेवर महापालिकेची कृपा?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

पुणे - इमारतीचा आराखडा मंजूर करताना दाखविलेल्या वाहनतळाच्या जागेत अनधिकृतपणे बाग केल्याबद्दल कारवाई करता येत नसल्याचे सांगून हात वर करण्याचा धक्कादायक प्रकार महापालिकेच्या बांधकाम विभागाने नुकताच केला आहे. संबंधित प्रकाराबाबत नागरिक दोन वर्षांपासून पाठपुरावा करीत असताना पोलिसांकडे गुन्हा दाखल करू, इतपतच कारवाई करता येईल, असे महापालिकेचे म्हणणे आहे. 

मार्केटयार्ड येथील पारसनीस कॉलनीत सर्व्हे क्रमांक ६९४-२ वर ‘नीलकमल’ इमारत आहे. त्या तीन मजली इमारतीत तीन सदनिका आहेत. इमारतीचा आराखडा मंजूर करताना तळमजल्यावर वाहनतळ आहे. मात्र, दोन सदनिकाधारकांनी वाहनतळाच्या जागेवर बाग तयार केली आहे. त्यामुळे इमारतीमध्ये वास्तव्य करणाऱ्या रहिवाशांना नाईलाजाने रस्त्यावर वाहने लावावी लागत आहेत. या बाबत रहिवासी आणि मेरे अपने संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब रुणवाल यांनी दोन वर्षांपूर्वी महापालिकेच्या बांधकाम विभागात याबाबत अर्ज केला. वाहनतळाची जागा त्याच कारणासाठी वापरण्यास भाग पाडावे, असे त्यांचे म्हणणे आहे; परंतु बगीचा हटविणे आमचे काम नाही, उद्यान विभागाचे आहे, असे सांगत बांधकाम खात्याने उद्यान विभागाकडे त्यांचा अर्ज पाठविला. उद्यान विभागाने संबंधित बगीच्यात मोठी झाडे नाहीत, असे सांगत बांधकाम विभागानेच त्याबाबतची कारवाई करावी, असे सांगितले. 

त्यामुळे रुणवाल यांनी पुन्हा बांधकाम विभागातील अधिकारी रमेश वाघमारे यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी बगीचा हटवण्याचा आम्हाला अधिकार नाही. फारतर आम्ही संबंधितांविरुद्ध पोलिसांकडे गुन्हा दाखल करू,’ असे सांगितले. वाहनतळाच्या जागेचा वापर वाहनतळासाठीच करावा, असे पत्र त्यांनी संबंधितांना दिले; परंतु इमारतीमधील बगीचा काढण्याबाबत महापालिका कारवाई करीत नसल्यामुळे रहिवाशांना नाईलाजाने रस्त्यावरच वाहने उभी करावी लागत आहेत. रुणवाल म्हणाले, ‘‘नियमांचे पालन करावे, ही मागणी महापालिकेचे संबंधित अधिकारी धुडकावून लावत आहेत. आठ वेळा लोकशाही व तक्रार निवारण दिनात दाद मागूनही कार्यवाही होत नाही. त्यामुळे आता संबंधित अधिकाऱ्यांच्या दालनासमोरच बेमुदत उपोषण करणार आहे.’’

Web Title: Unauthorized garden in pmc