तरुणांच्या स्वयंउद्योजकतेच्या पंखांना बळ

तरुणांच्या स्वयंउद्योजकतेच्या पंखांना बळ

पुणे - तुम्ही किमान आठवी उत्तीर्ण आहात आणि रोजगार सुरू करण्याची इच्छाशक्‍ती आहे, तर तुम्हाला स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत १० ते २५ लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध होऊ शकते. या आर्थिक वर्षात सुमारे २०० बेरोजगार तरुणांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून ३२ कोटी रुपयांचे कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केले आहेत. या उद्योग-व्यवसायांमध्ये इतर एक हजाराहून अधिक तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

बेरोजगार तरुण-तरुणींना सूक्ष्म, लघु आणि मध्यम स्वरूपाचा रोजगार सुरू करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येत आहेत. ग्रामीण भागासाठी खादी ग्रामोद्योग आयोग, खादी ग्रामोद्योग मंडळ आणि शहरी व ग्रामीण भागासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात फॅब्रिकेशन, ऑटो सर्व्हिस सेंटर, केटरिंग, मंगल सेवा केंद्र, ब्यूटी पार्लर, केबल टीव्ही नेटवर्क, गारमेंट, झेरॉक्‍स सेंटर, स्क्रीन प्रिंटिंग, ऑटोमोबाईल वर्कशॉप, कॉम्यूटर असेम्बलिंग, बेकरी, पेपर कप आणि रबरापासून वस्तू निर्मितीच्या उद्योग-व्यवसायाकडे तरुणांचा कल असल्याचे दिसून आले आहे.

चालू आर्थिक वर्षात ३२ कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले आहे. त्यापैकी सुमारे पाच कोटी ५८ लाख रुपये मार्जिन मनी मिळणार आहे. नवउद्योजकांना बॅंकेकडून कर्ज मंजूर झाल्यानंतर जिल्हा उद्योग केंद्राकडून दोन आठवड्यांचे प्रशिक्षण देण्यात येते. व्यावसायिक आणि उद्योजकांनी तीन वर्षे व्यवसाय व्यवस्थित सुरू ठेवल्यानंतरच ही अनुदानाची रक्‍कम दिली जाते. त्यामुळे उद्योग-व्यवसाय टिकवून सुरू ठेवण्याचे प्रमाणही वाढल्याचे जिल्हा उद्योग केंद्राच्या निष्कर्ष अहवालात समोर  आले आहे. 

जिल्हा उद्योग केंद्राकडे मशिनरी खरेदी करण्यासाठी सहा लाख रुपयांच्या कर्जाचा प्रस्ताव दिला होता. त्यापैकी पावणेसहा लाख रुपये बॅंकेकडून कर्ज उपलब्ध झाले. त्यातून तीन महिन्यांत उत्पादन सुरू केले आहे. 
- मंगेश आखाडे, लाभार्थी

यंदाच्या आर्थिक वर्षात १२२६ कर्ज प्रकरणे प्राप्त झाली होती. त्यापैकी राष्ट्रीयीकृत बॅंकांनी १८२ कर्ज प्रकरणे मंजूर केली आहेत. अनुदान रकमेच्या उद्दिष्टापेक्षा जास्त कर्ज वितरित केले आहे. या योजनेच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांनी स्वत-चा व्यवसाय सुरू केला आहे. विशेष म्हणजे त्याठिकाणी इतर एक हजाराहून अधिक तरुणांना रोजगार मिळाला आहे. 
- के. जी. डेकाटे, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र

असे मिळेल कर्ज....
  सेवा क्षेत्र व्यवसाय कर्ज मर्यादा - १० लाखांपर्यंत 
  उत्पादन क्षेत्रासाठी कर्ज मर्यादा - २५ लाख रुपयांपर्यंत
  शैक्षणिक पात्रता - किमान आठवी उत्तीर्ण
  अर्ज करण्यासाठी - www.kvionline\gov.in 
  स्वत:ची गुंतवणूक - ५ ते १० टक्‍के
  मिळणारे अनुदान - १५ ते ३५ टक्‍के
  लाभार्थीची निवड - जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत अनुसूचित जाती, जमाती, महिला, माजी सैनिक आणि अपंगांसाठी सवलत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com