'आरटीई'अंतर्गत 25 टक्के राखीव जागांवर प्रवेशासाठी धावपळ; कागदपत्रांसाठी पालकांची दमछाक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 एप्रिल 2019

उत्पन्नाचा दाखला, मुलांचा जन्मदाखला, आधार कार्ड अशी कागदपत्रे जोडली; तरी राहत्या घराचा पुरावा म्हणून आणखी कागदपत्रे मागण्यात आली. कागदपत्रांची पूर्तता करूनही अद्याप कोणतीही पोचपावती देण्यात आलेली नाही. त्यामुळे नेमका प्रवेश निश्‍चित झाला की नाही, हा प्रश्‍नच आहे. 

- अप्पासाहेब ननावरे, पालक 

पुणे : "प्रवेशासाठी राहत असलेल्या ठिकाणाची आणखी कागदपत्रे आणा', "कागदपत्रांत नमूद केलेल्या राहत्या घराच्या पत्त्यात तफावत असल्याने अधिक पुरावे सादर करा', "उत्पन्नासाठी अधिक पुरावे आणा'... अशा प्रश्‍नांचा भडिमार करीत पालकांना आणखी कागदपत्रे आणण्यास सांगितले जात आहे. त्यामुळे शिक्षक हक्क कायद्यांतर्गत 25 टक्के राखीव जागांवर पाल्याला प्रवेश मिळावा, यासाठी पालकांना नाहक धावपळ करावी लागत आहे. ऑनलाइन अर्जात नमूद केलेल्या कागदपत्रांव्यतिरिक्त अन्य कागदपत्रे मागण्यात येत असल्यामुळे पालकांची दमछाक होत आहे. 

शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी प्रवेशादरम्यान 25 टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. यासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. या प्रक्रियेतील पहिली लॉटरी नुकतीच जाहीर झाली आहे. त्यानुसार आता पाल्यांच्या प्रवेशासाठी पालक धावाधाव करीत आहेत. यापूर्वी पालकांना मोबाईलवर आलेल्या "एसएमएस'द्वारे प्रवेश निश्‍चित झाल्यानंतर संबंधित शाळेत जाऊन कागदपत्रांची पडताळणी करावी लागत होती. त्या प्रक्रियेत शाळा काही कारणे दाखवून प्रवेश नाकारत होत्या. हे लक्षात घेऊन शिक्षण विभागाने आता कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था उभारली असून, त्यासाठीची केंद्रे कार्यान्वित केली आहेत.

परंतु, आता या केंद्रातील अधिकाऱ्यांमार्फत अधिकाधिक कागदपत्रे मागितली जात असल्यामुळे पालकांची धावपळ होत आहे. तसेच, कागदपत्रे जमा केल्यानंतर कोणतीही पोचपावती मिळत नसल्याने प्रवेश निश्‍चित झाला की नाही, असा संभ्रम पालकांमध्ये निर्माण होत आहे. 

उत्पन्नाचा दाखला, मुलांचा जन्मदाखला, आधार कार्ड अशी कागदपत्रे जोडली; तरी राहत्या घराचा पुरावा म्हणून आणखी कागदपत्रे मागण्यात आली. कागदपत्रांची पूर्तता करूनही अद्याप कोणतीही पोचपावती देण्यात आलेली नाही. त्यामुळे नेमका प्रवेश निश्‍चित झाला की नाही, हा प्रश्‍नच आहे. 

- अप्पासाहेब ननावरे, पालक 
...... 
प्रवेश निश्‍चित झाल्याचे "एसएमएस'द्वारे कळाल्यावर पालक संबंधित संकेतस्थळावर जाऊन "ऍडमिट कार्ड' प्रिंट काढून घेत आहेत. यामध्ये कागदपत्रांच्या पडताळणीसाठी केंद्रावर संबंधित कागदपत्रे घेऊन जात आहेत. परंतु, अधिकाधिक कागदपत्रांची मागणी संबंधित अधिकाऱ्यांकडून होत असल्याने पालकांना धावाधाव करावी लागत आहे. 

- सुरेखा खरे, अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभा 

Web Title: Under RTE 25 Percentage Admission Reserve