'कागद वाचवा' प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांनी तयार केल्या 914 वह्या 

प्रफुल्ल भंडारी
शुक्रवार, 22 जून 2018

गेल्या बारा वर्षांपासून हा उपक्रम विद्यालयात राबविला जात असून तयार वह्या गरजू विद्यार्थ्यांना वितरित केल्या जात आहेत. 

दौंड (पुणे) - दौंड शहरातील शेठ ज्योतिप्रसाद विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी वहीबांधणी कार्यशाळेत कागदाचा पुनर्वापर करून विविध आकाराच्या 914 वहया तयार केल्या. गेल्या बारा वर्षांपासून हा उपक्रम विद्यालयात राबविला जात असून तयार वह्या गरजू विद्यार्थ्यांना वितरित केल्या जात आहेत. 
                     
विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेनेचे पथक प्रमुख प्रमोद काकडे यांनी दरवर्षी प्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेच्या पूर्वी गृहपाठ, वर्गपाठ, शास्त्र विभागातील जर्नल, आदी वह्यांमधील कोरी पाने जमा करण्याचे आवाहन  केले होते व त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. `कागद वाचवा ` प्रकल्पांतर्गत उन्हाळ्याच्या सुट्टीत विद्यालयात वहीबांधणी संबंधी कार्यशाळा घेण्यात आली होती व त्यामध्ये विद्यार्थ्यांनी संकलित केलेली पाने जुळविणे, वह्या स्टेपल करणे, पुठ्ठे चिकटवून बाईंडिंग कापड लावणे, आदी क्रिया करून घेण्यात आल्या. राष्ट्रीय हरित सेनेचे विद्यार्थी अजय वाघमारे, अश्विन कांबळे, सिद्धार्थ परदेशी, कुणाल पंगुडवाले, ऋतिक पेटकर, रोहन जाधव, निकिता साबळे, संध्या यादव, कोमल जाधव, आदींनी एकूण 914 वह्या तयार केल्या. वह्यांच्या मुखपृष्ठावर राष्ट्रीय हरित सेनेचे बोधचिन्ह व पर्यावरण विषयक संदेश छापण्यात आले आहेत.

कागद वाचवा प्रकल्पांतर्गत कागदाचा पुनर्वापर करत बारा वर्षात अशाप्रकारे सुमारे दहा हजार टिकाऊ वहया तयार करण्यात आल्या आहेत. सदर वह्या या प्रशालेतील 1600 विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते विनामूल्य वितरित करण्यात आल्या आहेत. विद्यालयाचे मुख्याध्यापक अजित गोडसे, भीमथडी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी विक्रम कटारिया, उपप्राचार्य श्रीकृष्ण देवकर, पर्यवेक्षक प्रदीप मस्के, मोहन खळदकर, मीना फुटाणकर, आदींनी या सातत्यपूर्ण उपक्रमाबद्दल सहभागी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: under save paper project students made 914 notebooks