ऍड. ससाणे यांची पाण्याखाली योगासने 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

पिंपरी : आरोग्य वृद्धीसाठी आपल्यापैकी अनेक जण योगासने करत असतील. परंतु, कोणताही ऑक्‍सिजन मास्क अथवा उपकरण न वापरता मागील दोन वर्षांपासून साताऱ्याचे ऍड. सुधीर ससाणे पाण्याखाली योगासने करण्याचा करिष्मा करत आहेत. नेहरूनगर येथील जलतरण तलावावर शनिवारी त्यांनी हीच योगासने सर्वांसमोर करून दाखविली. 

पिंपरी : आरोग्य वृद्धीसाठी आपल्यापैकी अनेक जण योगासने करत असतील. परंतु, कोणताही ऑक्‍सिजन मास्क अथवा उपकरण न वापरता मागील दोन वर्षांपासून साताऱ्याचे ऍड. सुधीर ससाणे पाण्याखाली योगासने करण्याचा करिष्मा करत आहेत. नेहरूनगर येथील जलतरण तलावावर शनिवारी त्यांनी हीच योगासने सर्वांसमोर करून दाखविली. 

महेशदादा स्पोर्टस्‌ फाउंडेशन आणि एस. एस. एस. एंटरप्राइजेसतर्फे आयोजित जलतरण प्रशिक्षण शिबिराच्या समारोपप्रसंगी त्यांनी आसने सादर केली. पहिले सुवर्णपदक विजेते पॅरॉलिंपिक जलतरणपटू मुरलीधर पेटकर, फाउंडेशनचे सचिव कुंदन लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत ऍड. ससाणे यांनी मगर जलतरण तलावात तब्बल अर्ध्या तासात पाण्याखाली 15 हून अधिक योगासने करून दाखविली. 

तत्पूर्वी "सकाळ'शी बोलताना ऍड. ससाणे म्हणाले, ""2007 पासून मी जलतरण करत आहे. मागील सहा वर्षांपासून योगासने करत आहे. जलतरण तलावात तासभर पोहणे होत नाही, हे लक्षात येताच हळूहळू मी पाण्याखाली कोणताही ऑक्‍सिजन मास्क किंवा उपकरण न वापरता योगासनांचा सराव सुरू केला. पहिला जागतिक योग दिन जाहीर झाल्यावर मी त्याकडे वेगळ्या दृष्टीने पहायला सुरवात केली. आता सध्या मी पाण्याखाली 40 हून अधिक योगासने करतो. साधारणतः एका श्‍वासात म्हणजे पाऊण ते 1 मिनिटात 1 आसन करतो. खरे तर मी एका श्‍वासात 3 ते 4 आसनेही करू शकतो. परंतु, ती योग्य पद्धतीने होत नाहीत. योगासनांचा आवश्‍यक परिणामही आपल्या शरीरावर साधता आला पाहिजे.'' 

ऍड. ससाणे यांनी सुखासनापासून आसने सादर करण्यास सुरवात केली. वज्रासन, शलभासन, पद्मासन, शीर्षासन, चक्रासन, मध्यपर्वतासन, वक्रासन, सर्वांगासन, पश्‍चिमोत्तानासन आदी 15 हून अधिक आसने त्यांनी पाण्याखाली करून दाखविली. सुनील ननवरे यांनी संयोजन केले. 

पाण्याखाली योगासने करण्याची कल्पना नावीन्यपूर्ण आहे. मुलांनी हे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय त्यांना कळणार नाही. जमिनीबरोबरच पाण्यातही आसने करता येऊ शकतात हे समजले. 
- मुरलीधर पेटकर, "पद्मश्री' किताब प्राप्त माजी पॅरॉलिंपिक जलतरणपटू 
 
 

Web Title: under water yoga presented by sasane