विवेकानंदांकडून जगण्याची स्फूर्ती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

‘निःस्वार्थीपणा हेच यशस्वी आणि आनंदी जीवनाचे सर्वांत मोठे रहस्य आहे,’ ‘आकांक्षा, असमानता आणि अज्ञानपणा हे बंधनांचे मूर्ती आहेत’, ‘कोणतेही कार्य अडथळ्यांवाचून पार पडत नाही, शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात, त्यांनाच यश प्राप्त होते’, हे विचार आहेत स्वामी विवेकानंद यांचे. म्युरल्सच्या माध्यमातून साकारलेल्या विचारांतून नागरिकांना जीवन जगण्याचे धडे व स्फूर्ती मिळत आहेत.

पिंपरी - ‘निःस्वार्थीपणा हेच यशस्वी आणि आनंदी जीवनाचे सर्वांत मोठे रहस्य आहे,’ ‘आकांक्षा, असमानता आणि अज्ञानपणा हे बंधनांचे मूर्ती आहेत’, ‘कोणतेही कार्य अडथळ्यांवाचून पार पडत नाही, शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात, त्यांनाच यश प्राप्त होते’, हे विचार आहेत स्वामी विवेकानंद यांचे. म्युरल्सच्या माध्यमातून साकारलेल्या विचारांतून नागरिकांना जीवन जगण्याचे धडे व स्फूर्ती मिळत आहेत.

निगडी-भोसरी स्माइन रस्त्यावर चिखली-प्राधिकरणातील शरदनगर येथे भुयारी मार्ग साकारला आहे. दोन महिन्यांपूर्वी तो रहदारीसाठी खुला केला. त्यामुळे संभाजीनगर व शरदनगर जोडले गेले. या मार्गातून जाताना स्वामी विवेकानंद यांच्या विविध भावमुद्रा आणि त्यांचे विचार लक्ष वेधून घेतात. मार्गाच्या दोन्ही बाजू मिळून वीस म्युरल्सच्या माध्यमातून स्वामी विवेकानंदांचे विचार समाजापर्यंत पोचविण्याचे उद्दिष्ट महापालिका व प्राधिकरणाने साकारले आहे.

असे आहेत विचार...
‘जीवनात जोखीम घ्या, जिंकल्यास पुढे जाऊ शकता आणि हरल्यास मार्गदर्शन करू शकता’; ‘जीवनात कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त मिळाली की विष बनते, मग ती ताकद असो, गर्व असो, पैसा असो वा भूक’; ‘आपल्या स्वभावानुसार सत्याने वागणे सर्वांत मोठा धर्म आहे, स्वतःवर विश्‍वास ठेवा’; ‘स्वतःचा विकास करा, ध्यानात ठेवा, गती आणि बळ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत’; ‘विश्‍व हे व्यायामशाळा आहे आणि आपण इथे स्वतःला मजबूत बनविण्यासाठी आलो आहे.’

जगण्याची स्फूर्ती मिळते - महाजन
शरदनगरमधील भुयारी मार्गातून जाताना एक ज्येष्ठ महिला स्वामी विवेकानंदांचे विचार कागदावर लिहून घेत होत्या. त्यांचे नाव नलिनी महाजन. जुन्या अकरावीपर्यंत शिकलेल्या. ‘अरे संसार संसार’ म्हणत कवितांमधून जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्या बहिणाबाई चौधरी यांचे माहेर असलेले आसोदा (ता. जि. जळगाव) हे महाजन यांचे मूळगाव. त्यांच्याशी संवाद साधल्यावर ‘अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला...’ अशा बहिणाबाईंच्या कविताही त्यांनी ऐकविल्या. स्वामी विवेकानंदांच्या विचारांबाबत त्या म्हणाल्या, ‘‘महिन्यापूर्वी मुलीकडे आले आहे. रस्त्याने जाता-येता स्वामी विवेकानंदांचे विचार वाचते. ते लिहून घेतले आहेत. खूप मोठे तत्त्वज्ञान त्यांनी मांडले आहे. या विचारातून जगण्यासाठी स्फूर्ती मिळते. खरा माणूस होण्याचे बळ मिळते. बहिणाबाईंच्या कवितांमधूनही जीवनाचे तत्त्वज्ञानच वाचायला मिळते.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Underground Road Murals Swami Vivekanand Philosophy