स्टार्ट अपसाठी संयुक्त उपक्रम हाती घेणार

स्टार्ट अपसाठी संयुक्त उपक्रम हाती घेणार

पुणे - भारत आणि इस्त्राईल ही दोन्ही ‘स्टार्ट अप’ राष्ट्रे आहेत. तरुणांमध्ये कल्पकता आणि नावीन्यपूर्ण विचार आहेत. त्यामुळे या दोन्ही देशांदरम्यान नावीन्यपूर्ण अधिकाधिक संयुक्त उपक्रम हाती घेता येतील. यासाठी आम्ही प्रयत्नशील असून, यामुळे या दोन्ही देशांना फायदाच होईल, असे प्रतिपादन इस्त्राईलचे भारतातील राजदूत डॉ. रॉन माल्का यांनी केले. 

पुणे इंटरनॅशनल सेंटरतर्फे ‘यशदा’ येथे मंगळवारी (ता. ६) ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर आणि उद्योजक रवी पंडित लिखित ‘लीप फ्रॉगिंग टू पोल व्होल्टिंग’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. माल्का आणि सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते करण्यात आले. उद्योजक अरुण फिरोदिया, पीआयसीच्या कार्यक्रम समितीचे अध्यक्ष प्रो. अमिताव मलिक या वेळी उपस्थित होते. ‘लीप फ्रॉगिंग टू पोल व्होल्टिंग’ या पुस्तकात डॉ. माशेलकर आणि पंडित यांनी क्‍लिष्ट जागतिक प्रश्नांवर भाष्य करीत ते सोपे करून त्यावर उपाय सुचविण्याचा प्रयत्न केला आहे.

डॉ. माशेलकर म्हणाले, ‘‘पोल व्होल्टिंग या खेळात शून्यातून सुरवात करून उंच उडी घ्यायची असते. अनपेक्षित परिणाम असलेली धोरणे, राजकीय नेतृत्व, समाजाची मानसिकता, असे विविध अडथळे यात येऊ शकतात. उत्तुंग महत्त्वाकांक्षा, कल्पकता आणि अभ्यासाच्या जोरावर ध्येय नक्की साध्य करता येते. बदल हे गतीने आणि शाश्‍वत पद्धतीने झाले पाहिजे. अडथळे आले तरी ते दूर करीत अभ्यासपूर्ण पद्धतीने कार्यरत राहायला हवे.’’

सार्वजनिक धोरण कसे असावे, याबाबत या पुस्तकात प्रकरण समाविष्ट करण्यात आल्याचे पंडित यांनी सांगितले. 

फिरोदिया म्हणाले, ‘‘हे पुस्तक वाचायला घेतले तेव्हा भारत-चीन यासंबंधी हे पुस्तक असेल, असे मला वाटले. मात्र, त्याही पुढे जाऊन कल्पकपणे जगाचा स्वर्ग कसा बनविता येईल, याची उदाहरणे या पुस्तकात पाहायला मिळाली, ही चांगली बाब आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com