अत्याचाराच्या चौकशीवरून हद्दीचा वाद 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

पुणे -  उंड्रीतील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील बालिकेवर लैंगिक अत्याचाराचा प्रकार गंभीर असूनही शिक्षण विभागाने त्याबाबत हद्दीचा वाद निर्माण केला आहे. प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी हा प्रकार शहर हद्दीत असल्याचे सांगत चौकशी करण्याची जबाबदारी झटकली, तर महापालिकेच्या शिक्षण मंडळाने हा प्रकार जिल्हा परिषदेच्या हद्दीत घडल्याचे म्हटले आहे. 

पुणे -  उंड्रीतील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील बालिकेवर लैंगिक अत्याचाराचा प्रकार गंभीर असूनही शिक्षण विभागाने त्याबाबत हद्दीचा वाद निर्माण केला आहे. प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी हा प्रकार शहर हद्दीत असल्याचे सांगत चौकशी करण्याची जबाबदारी झटकली, तर महापालिकेच्या शिक्षण मंडळाने हा प्रकार जिल्हा परिषदेच्या हद्दीत घडल्याचे म्हटले आहे. 

गेल्या आठवड्यात शाळेच्या वाहनचालकाने विद्यार्थिनींवर अत्याचार केला होता. तिच्या पालकांनी तक्रार केल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्याच दिवशी प्राथमिक शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी मुश्‍ताक शेख यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे लेखी आदेश दिले होते. या घटनेला दहा दिवस उलटून गेले असतानाही त्यांनी चौकशी केली नाही. हा प्रकार महापालिकेच्या हद्दीत घडल्याचे सांगत त्यांनी चौकशीचे काम शिक्षण मंडळाकडे दिले. 

शिक्षण मंडळाच्या प्रभारी प्रमुख शुभांगी चव्हाण याबाबत म्हणाल्या, ""महापालिका हद्दीत गुन्हा घडल्याचे सांगण्यात आल्यानंतर अधिकाऱ्यांना तेथे पाठविले; परंतु ती शाळा जिल्हा परिषदेच्या हद्दीत असल्याचे लक्षात आले. तरीही अधिकाऱ्यांनी शाळेत जाऊन घटनेची माहिती घेतली. ती जिल्हा परिषदेकडे पाठविली जाणार आहे.'' 

शाळेत लैंगिक अत्याचाराचा प्रकार घडल्यानंतर सखोल चौकशी करावी लागते. शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक, पीडित बालिकेचे पालक यांचे जबाब नोंदवावे लागतात. शाळेने हा प्रकार लपविला का, हेही तपासावे लागते; परंतु संचालकांचे लेखी आदेश असूनही शेख यांनी त्यांची जबाबदारी पार पाडलेली नाही. याबाबत संचालक डॉ. नांदेडे म्हणाले, ""उंड्रीतील प्रकार संवेदनशील आहे. शेख यांनी तत्काळ चौकशी करणे अपेक्षित होते. कर्तव्यात कसूर केल्याबद्दल त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावणार आहे.'' 

बालिकेवर लैंगिक अत्याचाराचा प्रकार संवेदनशील असतानाही शिक्षणाधिकाऱ्यांनी त्याबाबत हद्दीचा वाद निर्माण करावा, हे संतापजनक आहे. अशा अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई झाली पाहिजे. तसेच असा प्रकार घडल्यानंतर किती दिवसांत चौकशी व्हावी, यासाठी शिक्षण खात्याने नियम तयार केला पाहिजे. 
- नीलम गोऱ्हे, आमदार 

Web Title: Undritila English medium school girl sexually assaulted