उमेदवारांच्या निधींचा पक्षांना आधार!

मंगेश कोळपकर 
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

पुणे - महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षनिधी म्हणून प्रत्येक उमेदवाराकडून दोन लाख रुपये, तर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस या पक्षांनी एक लाख रुपये पक्षनिधी म्हणून वसूल केला आहे. यातून भाजप आणि मनसेकडे किमान तीन कोटी रुपये, तर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसकडे प्रत्येकी दीड कोटी रुपये जमा झाले आहेत. 

पुणे - महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षनिधी म्हणून प्रत्येक उमेदवाराकडून दोन लाख रुपये, तर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस या पक्षांनी एक लाख रुपये पक्षनिधी म्हणून वसूल केला आहे. यातून भाजप आणि मनसेकडे किमान तीन कोटी रुपये, तर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसकडे प्रत्येकी दीड कोटी रुपये जमा झाले आहेत. 
उमेदवारांकडून घेण्यात येणारी ही रक्कम अधिकृत असून उमेदवारांसाठी राज्य निवडणूक आयोगाने निश्‍चित केलेल्या खर्चात ती दाखविण्यात येणार आहे. त्यातून पुढच्या दहा दिवसांत जाहीर सभा, मेळावे, पदयात्रांचा खर्च भागविला जाणार असल्याचे या पक्षाच्या प्रतिनिधींकडून सांगण्यात आले.    

महापालिका निवडणुकीतील उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा पाच लाखांवरून १० लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली. या खर्चातून पक्षनिधी द्यावा, असे पक्षांनी उमेदवारांना सांगितले. उमेदवारांना अधिकृत उमेदवारी पत्र (एबी फॉर्म) देतानाच भाजपने प्रत्येकी दोन लाख रुपयांचा डीमांड ड्राफ्ट पक्षाच्या नावाने घेतला. उर्वरित पक्षांनीही त्याबाबत उमेदवारांना खर्चाची कल्पना दिली आहे. 

निवडणुकीच्या काळात उमेदवारांकडून प्रचारफेऱ्या, मेळावे होत असले, तरी राजकीय पक्षांच्या मध्यवर्ती कार्यालयाकडूनही जाहीर सभा, मेळावे, पदयात्रा, फेऱ्यांचे आयोजन केले जाते. उमेदवारी अर्ज भरल्यावर उमेदवारांनी केलेल्या प्रचाराचा खर्च त्यांच्या हिशेबात धरला जातो. मात्र, राजकीय पक्षांच्या बाबत तसे होत नाही. त्यांना उत्पन्नाचा स्रोत जाहीर करून प्रचाराच्या खर्चाचा हिशेब निवडणूक आयोगाला सादर करावा लागतो. त्यामुळे उमेदवारांसाठी निश्‍चित केलेल्या खर्चाच्या रकमेतून एक किंवा दोन लाख रुपये पक्षासाठी घेण्यात आले आहेत.

राजकीय पक्षांकडून होणार १५ कोटी खर्च 
शहरातील पाचही प्रमुख राजकीय पक्षांकडून जाहीर सभा, मेळावे, पदयात्रा आदी विविध प्रकारच्या प्रचारासाठी किमान पंधरा कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्यातील १० कोटी ५० लाख रुपये हे उमेदवारांच्या प्रचारातून खर्च होणार आहेत, तर उर्वरित साडेचार कोटी रुपये हे उमेदवारी अर्जांच्या माध्यमातून राजकीय पक्षांनी उभारले आहेत.

प्रचारासाठीच्या जाहीर सभा, मेळावे आणि आनुषंगिक कार्यक्रम, जाहिराती यांकरिता उमेदवारांकडून वेगळा निधी घेतला जात नाही, तर पक्ष संघटनेकडून त्याचा समन्वय साधला जातो, त्याचा हिशेब काटेकोर ठेवला जातो.
- वंदना चव्हाण, शहराध्यक्षा, राष्ट्रवादी काँग्रेस

पक्ष संघटनेला एरवी उत्पन्नाचे साधन नसते. त्यामुळे उमेदवारी अर्जाच्या माध्यमातून मिळणारा निधी संघटनेसाठीच वापरला जातो. तसेच, उमेदवारांच्या प्रचाराच्या खर्चातूनही शहर स्तरावरील उपक्रमांचे आयोजन होणार आहे.
- योगेश गोगावले, शहराध्यक्ष, भाजप 

उमेदवारांच्या निवडणूक खर्चातून काँग्रेसने फक्त एक लाख रुपयांचा निधी घेतला आहे. प्रचाराच्या निमित्ताने पक्षाची नेते मंडळी शहरात येतात. तसेच, विविध उपक्रम राबविले जातात. त्यासाठी हा निधी महत्त्वाचा ठरतो.
- रमेश बागवे, शहराध्यक्ष, काँग्रेस

पक्ष संघटना महत्त्वाची असते. प्रचारासाठी सोशल मीडियापासून अनेक उपक्रम राबविले जात आहेत. पक्षाचा खर्च भागविण्यासाठी अशी प्रक्रिया आवश्‍यक आहे.
- हेमंत संभूस,  शहरप्रमुख, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

पक्ष संघटनेला नियमित उत्पन्न मिळत नाही. यामुळे निवडणुकीत उमेदवारी अर्ज शुल्क आणि प्रचाराच्या खर्चातून पक्ष संघटनेचा खर्च भागविला जातो. पक्षाच्या हितासाठी यानिधीचा उपयोग केला जातो. 
- विनायक निम्हण, शहरप्रमुख, शिवसेना

Web Title: unds by political parties and candidates