अपघातात जखमी झालेल्या कुटुंबाकडून अज्ञात चोरट्यांनी ४१ हजार रुपयांचा ऐवज लुटला

डॉ. संदेश शहा
Saturday, 14 November 2020

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पळसदेव हद्दीत दुचाकीवरून पडून अपघातात जखमी झालेल्या कुटुंबाकडून अज्ञात चोरट्यांनी ४१ हजार रुपयांचा ऐवज लुटला. ही घटना (दि. १२) नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजता घडली.

इंदापूर : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पळसदेव हद्दीत दुचाकीवरून पडून अपघातात जखमी झालेल्या कुटुंबाकडून अज्ञात चोरट्यांनी ४१ हजार रुपयांचा ऐवज लुटला. ही घटना (दि. १२) नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजता घडली.
  
फिर्यादी बाळुबाई महादेव आनरसे (वय ५२ रा.पळसदेव आनरसे वस्ती ता. इंदापूर जि. पुणे) यांचे लोणी देवकर येथे पाले भाज्याचे दुकान आहे. घटनेच्या दिवशी रात्री आठ वाजता त्या त्यांच्या नातवंडासह दुकान बंद करुन लोणी-देवकर वरुन पळसदेवकडे मोटरसायकलने घरी जात होते. त्यावेळी त्यांच्या दुचाकीसमोर रस्त्याच्या बाजूकडून अचानक एक इसम समोर आल्याने दुचाकीवरील सर्व खाली पडून जखमी झाले. त्याच दरम्यान अनोळखी तीन इसम त्यांच्या जवळ आले. त्यांनी फिर्यादीच्या गळ्यातील २५ हजार रुपयांचे सोन्याचे मणी मंगळसूत्र, रोख १५ हजार रुपये व एक हजार रुपये किंमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा एकूण ४१ हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला. 
 
फिर्यादीने इंदापूर पोलिस ठाण्यात (दि.१३) नोव्हेंबर रोजी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून फौजदार सुशील लोंढे पुढील तपास करत आहेत.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unidentified thieves looted Rs 41 thousand from a family injured in an accident on Pune-Solapur National Highway