गणवेश अन्‌ शालेय साहित्य वेळेत! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 ऑगस्ट 2018

पुणे : गणवेश आणि शैक्षणिक साहित्याचे पैसे थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या निर्णयाचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. महापालिकेच्या शाळांतील 95 टक्‍क्‍यांहून अधिक विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा झाले आहेत. पावणेसहा हजार विद्यार्थी किंवा त्यांच्या पालकांची बँक खाती नसल्याने त्यांना अद्याप पैसे मिळाले नाहीत. त्यांची खाती लवकरच उघडली जातील, असा दावा प्रशासनाने केला आहे. 

आर्थिक अनुदान किंवा विविध योजनांचा लाभ हा थेट संबंधित व्यक्तीला मिळण्यासाठी राज्य सरकारने थेट लाभार्थी हस्तांतरण (डीबीटी) पद्धत राबविण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेश आणि शैक्षणिक साहित्य देण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. गेल्या वर्षी महापालिका प्रशासनाने 'डीबीटी कार्ड' योजना राबविली होती. यासाठी ठेकेदार नियुक्त केल्याने ती वादाची ठरली होती. यंदादेखील स्थायी समितीत या विषयाच्या मंजुरीला विलंब झाला होता. अखेर हे पैसे थेट विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे यंदा विद्यार्थ्यांना वेळेवर गणवेश आणि साहित्य मिळण्यास मदत झाली आहे. मात्र, अद्याप पावणेसहा हजार विद्यार्थी किंवा त्यांच्या पालकांचे बॅंक खाते नसल्याने ते या लाभापासून वंचित आहेत. त्यांची खाती लवकर उघडून त्यांच्या खात्यांवर रक्कम वर्ग करण्यात येईल, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. 

13 कोटी 90 लाख रुपये वर्ग 
महापालिकेच्या शाळांत एकूण 84 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांच्यापैकी 34 हजार विद्यार्थ्यांची अथवा त्यांच्या पालकांची बॅंक खाती होती. त्यांच्या खात्यात सर्वांत प्रथम रक्कम वर्ग केली गेली. उर्वरित विद्यार्थी आणि पालकांची माहिती घेऊन बॅंक खाती उघडली गेली. आतापर्यंत विद्यार्थी आणि पालकांच्या खात्यामध्ये 13 कोटी 90 लाख रुपये वर्ग केले गेले आहेत. 
 
बँक खात्यात जमा झालेल्या पैशांचा योग्य विनियोग झाला आहे की नाही, हे तपासण्यासंदर्भात मुख्याध्यापकांना सूचना देण्यात आल्या आहेत. शालेय साहित्य खरेदीच्या पावत्या पालकांकडून जमा करून त्याची शहानिशा केली जाईल. 
-शिवाजी दौंडकर, शिक्षण प्रमुख 
 
Web Title: Uniforms and school materials in time!