
FTII दौऱ्यावर आलेल्या अनुराग ठाकूर यांना विद्यार्थ्यांच्या नाराजीला जावे लागले सामोरे
पुणे : केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी गुरुवारी भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेला (एफटीआयआय) भेट दिली. परंतु या भेटीदरम्यान ठाकूर यांना संस्थेतील विद्यार्थ्यांच्या नाराजीला सामोरे जावे लागले. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ‘देश के गददारों को, गोली मारो सालों को’असे वक्तव्य करून सामाजिक अशांतता निर्माण केलेल्या व्यक्तीचे वारसा असणाऱ्या ‘एफटीआयआय’मध्ये स्वागत नको, अशा आशयाचे फलक हाती धरत विद्यार्थ्यांनी शांततेच्या मार्गाने ठाकूर यांच्या दौऱ्याला विरोध दर्शविला.
ठाकूर हे पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी एफटीआयआयला गुरुवारी सकाळी भेट दिली. त्यावेळी ‘वुई स्टँड अगेंस्ट पॉलिटिक्स ऑफ हेट’,‘मिनिस्टर ऑफ हेट यू आर नॉट वेलकम’अशा स्वरूपाचे फलक हातात घेत विद्यार्थ्यांनी ठाकूर यांच्या विरोधात मूक निदर्शने केली. माहिती व प्रसारण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव अपूर्व चंद्रा यांना विद्यार्थी निदर्शने करणार असल्याचे कळताच, त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
ठाकूर यांनी संस्थेचे पदाधिकारी आणि विभागप्रमुखांची बैठक घेतली. दरम्यान, विद्यार्थ्यांना त्यांचे प्रश्न मंत्र्यांसमोर मांडायचे होते. त्यामुळे मंत्र्यांना भेटण्याची संधी मिळावी, यासाठी विद्यार्थ्यांच्या संघटनेच्या वतीने संस्थेच्या अध्यक्षांकडे सातत्याने विनंती करण्यात येत होती. अखेर ठाकूर यांनी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधण्यासाठी दोन मिनिटांचा वेळ दिला. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर तब्बल दोन वर्षांनंतर संस्थेत पुन्हा एकदा ऑफलाइन शिक्षण सुरू झाले आहे. असे असताना संस्थेने केलेली शुल्कवाढ, पायाभूत सुविधा नसणे, नियामक मंडळात विद्यार्थी प्रतिनिधीचा असलेला अभाव, अशा समस्या विद्यार्थ्यांनी ठाकूर यांच्यासमोर मांडल्या.
विद्यार्थ्यांनी मांडलेल्या मागण्या
‘एफटीआयआय’मधील शुल्कवाढ रद्द करावी
संस्थेने सर्वसामान्यांना परवडणारे शिक्षण द्यावे
‘एफटीआयआय’ला राष्ट्रीय दर्जा द्यावा
पायाभूत सुविधा पुरविण्यात याव्यात
‘एफटीआयआय’चे खासगीकरण थांबवावे
विद्यार्थ्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणू नये
‘‘केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे यापूर्वी कधीही संस्थेत आलेले नाहीत. त्यांनी राजकीय प्रचारादरम्यान देशात धार्मिक द्वेष पसरविणारे विचार मांडले, ते आम्हाला मान्य नाहीत. त्याचा आम्ही शांततेच्या मार्गाने निषेध केला. ठाकूर यांनी आम्हाला संवाद साधण्यासाठी दोन मिनिटांचा अवधी दिला होता. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत आम्ही त्यांना सांगितले. सध्या संस्थेत सुरक्षा अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांवर नियंत्रण ठेवण्यात येते. तसेच पायाभूत सुविधांचा अभाव आहे.’’
- अवंती बसर्गेकर, अध्यक्ष, एफटीआयआय स्टुडंट असोसिएशन
Web Title: Union Broadcasting And Information Minister Ftii Visit Displeasure Students Anurag Thakur Protest Not Welcome
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..