भाजपच्या कार्यक्रमात नितीन गडकरींना 'घड्याळ' भेट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 डिसेंबर 2018

अर्थात, गडकरींना देण्यात आलेल्या 'घड्याळ' भेटीची उपस्थितांमध्ये चर्चा न झाल्यास नवलच. घड्याळ भेट दिले असले तरी त्या घड्याळावर भाजपच्या 'कमळ' पक्षाचीच खूण आहे. याचीही खुसखुशीत चर्चा कार्यक्रमात रंगली. ​

पुणे : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या 94 व्या जयंतीनिमित्त पुण्यातील नूमवी प्रशालेत आज (रविवार) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन झाले, दरम्यान भाजप नगरसेवक हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात नितीन गडकरी यांचा सत्कार करताना पुष्पगुच्छासह 'घड्याळ' ही सप्रेम भेट देण्यात आले.

अर्थात, गडकरींना देण्यात आलेल्या 'घड्याळ' भेटीची उपस्थितांमध्ये चर्चा न झाल्यास नवलच. घड्याळ भेट दिले असले तरी त्या घड्याळावर भाजपच्या 'कमळ' पक्षाचीच खूण आहे. याचीही खुसखुशीत चर्चा कार्यक्रमात रंगली.

दरम्यान पुण्यात येण्यापूर्वी पुणेकरांसाठी कबूल केलेल्या कामांची कागदोपत्री पूर्तता व्हायला हवी याबाबत उल्लेख करतान गडकरी म्हणाले की, ''पुण्यात येण्यापूर्वी माझ्या मनात एक गोष्ट होती की, चांदणी चौकातील पुलाचे काम सुरू झाले नव्हते. कारण त्याकरिता लागणारी जमीन अधिग्रहण झाली नव्हती. 80 टक्के पैसे मिळाल्याशिवाय काम सुरू करणार नाही अशी भूमिका ठेकेदाराने घेतली होती. पण माझा पुणे दौरा निश्चित झाला तेव्हा माझ्या अधिकाऱ्यांना ताकीद दिली की, मी पुण्यात जाण्यापूर्वी ठेकेदाराला वर्कऑर्डर मिळाली पाहिजे आणि त्यानंतर काही वेळातच वर्क ऑर्डर त्याला मिळाली. उद्यापासून त्या कामाची जोरात सुरवात होईल. त्यामुळे पुण्याकरता कबूल केलेली सर्व कामे मी पूर्ण करतोय'' असं देखील गडकरी यांनी आवर्जून सांगितलं, तसेच ''संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे काम जानेवारी महिन्यात सुरु करणार येईल'' , असेही गडकरी म्हणाले.

Web Title: Union minister Nitin Gadkari was given a 'gift of watch' on BJP's program