
एखादे वाहन रहदारीस अडथळा ठरत आहे, असे वाटल्यास त्या वाहनाला जीपने धडक देऊन वाहतूक नियंत्रण करण्याची अनोखी पद्धत पिंपरीच्या वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिस अधिकारी संतोष पाटील यांनी अवलंबिली आहे.
पिंपरी - एखादे वाहन रहदारीस अडथळा ठरत आहे, असे वाटल्यास त्या वाहनाला जीपने धडक देऊन वाहतूक नियंत्रण करण्याची अनोखी पद्धत पिंपरीच्या वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिस अधिकारी संतोष पाटील यांनी अवलंबिली आहे. याचा अनुभव रिक्षा पंचायतीचे अशोक मिरगे यांनी नुकताच घेतला. या प्रकाराबाबत त्यांनी पोलिस अधिकारी पाटील यांच्याविरोधात उपायुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.
मिरगे हे रविवारी (ता. १०) सकाळी साडेअकराच्या सुमारास रिक्षा घेऊन पिंपरी पुलावरून मोरवाडीकडे चालले होते. तेवढ्यात एका महिला प्रवाशाने हात केल्याने त्यांनी रिक्षा बाजूला घेतली. रस्त्यावर फारशी वाहनेही नव्हती. त्याचवेळी पिंपरी वाहतूक विभागाचे अधिकारी संतोष पाटील जीपमधून जात होते. रिक्षा हळू झाल्याचे त्यांनी पाहिल्यावर त्यांनी जीपने थेट मिरगे यांच्या रिक्षाला मागून धडक दिली.
'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
मात्र, सुदैवाने कोणाला इजा झाली नाही. याविषयी जीपचालकाला मिरगे यांनी विचारणा केली असता ‘इथं रिक्षा थांबवू नको’, असे पाटील यांनी मिरगे यांना सुनावले. तसेच जास्त बोललास तर पिंपरीत तुला रिक्षा चालवू देणार नाही, असा दमही भरला. वाहतूक पोलिस जीपने धडक दिल्याची तक्रार पिंपरी पोलिसांकडे दाखल करण्यात आली आहे. पाटील यांच्यावर कारवाई न झाल्यास रिक्षा पंचायत आंदोलन करेल, असे मिरगे यांनी म्हटले आहे.