शिरूरमधील अभंग बंधूंच्या देशसेवेला सलाम 

shirur
shirur

शिरूर (पुणे) : शिरूर येथील दत्तात्रेय व दिगंबर हे अभंग बंधू आपला लॉंड्री व्यवसाय चालविताना मुख्य सरकारी कार्यालये व इतर ठिकाणचे राष्ट्रध्वज धुवून, इस्त्री करून देण्याचे कर्तव्य पार पाडीत आहेत. प्रतिकूल परिस्थितीत हा व्यवसाय करताना ते कर्तव्य भावनेने हे कार्य विनामूल्य करीत आहेत. 

शिरूर येथील डंबेनाला परिसरात त्यांचे कपडे इस्त्रीचे छोटेसे दुकान असून, दत्तात्रेय व दिगंबर हे दोघे बंधू या ठिकाणी अथक मेहनत करून कुटुंबाचा गाडा पुढे चालवीत आहेत. त्यांचे वडील (स्व.) रतननाना अभंग यांनी चाळीस वर्षे कपडे इस्त्रीचा व्यवसाय केला. त्यांचे वडील (स्व.) काशिनाथ अभंग हे देखील मुंबईत कपडे धुण्याचे काम करीत असत. आता अभंग घराण्याची तिसरी पिढी दत्त-दिगंबराच्या माध्यमातून हा व्यवसाय करीत आहे. 

स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिनी त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात कपडे इस्त्रीला येतात. यात शालेय मुलांचे गणवेषही अधिक असतात. त्यामुळे या राष्ट्रीय सणांच्या आधी दोन दिवस त्यांचे छोटेसे दुकान कपड्यांनी भरून जाते. छोट्या विद्यार्थ्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचेच कपडे वेळेत देण्यासाठी त्यांची मोठी धांदल उडते. मात्र, असे असतानाही देशप्रेम, देशभक्ती आणि सामाजिक बांधिलकी जपत या दिवशी इस्त्रीसाठी आलेले राष्ट्रध्वज स्वच्छ धुवून व कडक इस्त्री मारून देण्याचे काम ते विनामूल्य करतात. सरकारी कार्यालयात स्वतः जाऊन तेथील राष्ट्रध्वज आणतात आणि धुवून, इस्त्री करून परत नेऊन देतात. 

स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताकदिन हे आपले राष्ट्रीय सण आहेत. या सणांच्या निमित्ताने राष्ट्राप्रती आपले अत्यंत किरकोळ स्वरूपातील योगदान देता येऊ शकते. या भावनेतून तिरंगी झेंड्याच्या इस्त्रीचे पैसे घ्यायचे नाहीत, असा आमचा संकल्प आहे. मुळात तिरंगी झेंडा हा कुणा एकाचा नसून समस्त समाजाचा आहे. त्याचे कुणा एकाकडून पैसे घेणेच आम्हाला योग्य वाटत नाही. गरीब विद्यार्थी असेल तर त्याच्या शाळेचा गणवेषही पैसे न घेता इस्त्री करून देतो. 
- दत्तात्रेय व दिगंबर अभंग 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com