मोशीत अनोखा विवाह सोहळा; दहा जवानांना दिली वऱ्हाडींनी सलामी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

देशभक्तीपर गीतांनी निर्माण झालेले वातावरण... प्रत्येकाच्या गालावरील तिरंगा... राष्ट्रगीताने कार्यक्रमाची झालेली सुरुवात... हे सारे वातावरण स्वातंत्र्य दिन किंवा प्रजासत्ताक दिनाचे नव्हे; तर ते आहे लग्न समारंभाचे. मोशीतील निवृत्त जवानाने आपल्या कन्येचा विवाह अशा अनोख्या पद्धतीने केला. कारगिल युद्धात दिव्यांगत्व प्राप्त झालेल्या दहा जवानांचा सन्मान करण्यात आला. जवांनाना सलामी देताना या लग्नसमारंभातील वऱ्हाडी मंडळींनी देशाभिमानाची अनुभूती घेतली.

मोशी - देशभक्तीपर गीतांनी निर्माण झालेले वातावरण... प्रत्येकाच्या गालावरील तिरंगा... राष्ट्रगीताने कार्यक्रमाची झालेली सुरुवात... हे सारे वातावरण स्वातंत्र्य दिन किंवा प्रजासत्ताक दिनाचे नव्हे; तर ते आहे लग्न समारंभाचे. मोशीतील निवृत्त जवानाने आपल्या कन्येचा विवाह अशा अनोख्या पद्धतीने केला. कारगिल युद्धात दिव्यांगत्व प्राप्त झालेल्या दहा जवानांचा सन्मान करण्यात आला. जवांनाना सलामी देताना या लग्नसमारंभातील वऱ्हाडी मंडळींनी देशाभिमानाची अनुभूती घेतली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लष्करातून निवृत्त झालेले जवान धनेश्‍वर भोस यांना कारगिल युद्धात शत्रूशी लढताना आपला पाय गमवावा लागला होता. आपली कन्या प्रियांका हिच्या लग्नसमारंभात जवानांचा सन्मान करून देशाबद्दल असलेला आदरभाव व्यक्त करण्याची भोस यांची इच्छा होती. कन्या प्रियांका आणि वैभव थोपटे यांचा विवाह मोशीत सोमवारी (ता. २०) झाला. कारगिल युद्धामधील जखमी झालेल्या धनेश्वर भोस या सेवानिवृत्त जवानाने आपल्या कन्येच्या विवाह सोहळ्यात कारगिल युद्धामध्ये पराक्रम गाजविताना दिव्यांगत्व प्राप्त झालेल्या दहा जवानांना खास सत्कार समारंभ आयोजित केले.

घटस्फोट देत नाही म्हणून पतीचा पत्नीला घराबाहेर काढण्याचा कट

त्याप्रमाणे शंकर लाखे, रामदास मोरे, गोविंद बिरादार, पांडुरंग यादव, व्ही. एम. सुरवस, विष्णू सुर्वे, बसवराज पट्टणशेड्डी, अमित यादव, जितेंद्र सिंग, साईनाथ पोळ कल्लाप्पा माने आणि कर्नल भार्गव यांचा लग्नसोहळ्याच्या व्यासपीठावर सन्मान करण्यात आला. लग्नसोहळ्याची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर मंगलाष्टका झाली. सोहळ्यात सहभागी झालेल्या वऱ्हाडी मंडळींनी राष्ट्रगीतानंतर सन्मान झालेल्या जवानांना सलामी दिली. अशा अनोख्या पद्धतीने सन्मानित केल्याबद्दल जवानांनी वधू-वराच्या पित्याचे आभार मानले. जवान रामदास मोरे म्हणाले, ‘‘सैनिकांविषयी देशातील प्रत्येकाच्या मनात अभिमान असतो. हे यातून दिसून आले.’’ जवानांचा सत्कार केल्याने हा विवाह सोहळा अनोखा तर ठरलाच परंतु तो देशभक्तिपर ठरला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unique wedding ceremony in Moshi