संरक्षणासाठी तरुणींची पथके नेमा - सत्यनारायण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जानेवारी 2017

पुणे - '"महिला-तरुणींवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी आपण सरकार आणि कायद्याला दोष देतो; पण पुढे येऊन काही करत नाही. स्वतःच्या सुरक्षेसाठी आता महिलांनी एकजुटीने निर्भीडपणे आवाज उठवला पाहिजे. त्यांच्या एकजुटीने दबाव निर्माण होऊन बदल घडू शकेल. त्यासाठी तरुणींना संरक्षणाचे धडे देण्यासह प्रत्येक वॉर्डमध्ये तरुणींची भरारी पथके स्थापन करणे गरजेचे आहे,'' असे मत राज्याच्या माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी शनिवारी व्यक्त केले.

"अखिल भारतीय महिला परिषदे'च्या "पुणे महिला मंडळा'च्या 90 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजिलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. "माहेर' संस्थेच्या संस्थापिका ल्युसी कुरियन, परिषदेच्या अध्यक्षा वीणा कोहली, नियोजित अध्यक्षा राकेश धवन, उपाध्यक्षा शीला काकडे, मंडळाच्या अध्यक्षा उल्का शहा, सचिव केतकी कुलकर्णी, रेखा साळी आणि हेमा ओसवाल या वेळी उपस्थित होत्या.

सत्यनारायण म्हणाल्या, 'मंडळाला 90 वर्षांची परंपरा लाभली आहे. मंडळाचा पाया रुजविण्यासाठी अनेक महिलांनी योगदान दिले. त्यांचे हेच सकारात्मक प्रयत्न लघुपटाच्या माध्यमातून लोकांसमोर आले पाहिजेत. महिलांनी सामाजिक प्रश्‍न हाताळले पाहिजेत. महिला सुरक्षिततेविषयी जागृती करताना पोलिस आणि सामाजिक संस्थांना एकत्र घेऊन कार्यक्रम आखावा. त्यानुसार वॉर्डनिहाय तरुणींसाठी स्वरक्षणाचे धडे देणारे वर्ग सुरू करावेत. त्यातील काही तरुणींना गणवेश आणि ओळखपत्र देऊन त्यांना महिला सुरक्षिततेसाठी कार्य करण्यासाठी प्रोत्साहित करावे. तसेच पथके उभारण्यासाठी सोशल नेटवर्किंगचा वापर करावा.''

कुरियन म्हणाल्या, 'माझ्या संस्थेत 870 मुले-मुली राहत आहेत. प्रत्येकाच्या आयुष्याची कथा वेगळी आहे आणि संघर्षही. या मुलांना मदतीचा हात दिला पाहिजे. प्रेम आणि आपुलकीच्या भावनेने त्यांचे जीवन बदलू शकते. त्यांच्या शिक्षणासाठी व संवर्धनासाठी वेळ काढावा. एक मुलगा-मुलगी शिकली, तर आपलेही आयुष्य बदलेल.''

...तर पुणे भयमुक्त शहर
'पुण्याच्या महिला तेजस्वी आहेत. कोणत्याही क्षेत्रात पुण्याच्या महिलांनी स्वतःच्या कामाने एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे महिला सुरक्षिततेच्या मुद्‌द्‌यावर जर पुण्यातल्या महिलांनी एकजुटीने काम केले, तर नक्कीच "पुणे' हे महिला-तरुणींसाठी सुरक्षित आणि भयमुक्त शहर बनेल,'' असे नीला सत्यनारायण यांनी सांगितले.

Web Title: Units for the protection of women