विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा केंद्राची ‘हाफ सेंच्युरी’

Savitribai-Phule-University
Savitribai-Phule-University

पुणे - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत मराठी टक्का वाढविण्यासाठी पदवीचे शिक्षण सुरू असतानाच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सुरू केलेल्या तीन वर्षांच्या विशेष अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्याच वर्षी या अभ्यासक्रमाला ५१ जणांनी प्रवेश घेतला आहे. डिसेंबर महिन्यापासून हे वर्ग सुरू होणार आहेत.

शहरात स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाची तयारी करून घेण्यासाठी खासगी केंद्रांचे पेव फुटले आहे. यामध्ये विद्यार्थी लाखो रुपये वर्षाला खर्च करतात. परंतु, यामध्ये त्यांचे मूळ शिक्षण बाजूला पडते. अनेक विद्यार्थी पदवीचे शिक्षण चांगल्या गुणांनी पूर्ण करीत नाहीत. शिवाय, स्पर्धा परीक्षेत अपेक्षित यश मिळत नसल्याने त्यांच्या भवितव्याचा प्रश्‍न निर्माण होतो. पुणे विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा केंद्राने (सीईसी) विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी तीन वर्षांच्या अभ्यासक्रमाची घोषणा सप्टेंबरमध्ये केली होती. या अभ्यासक्रमात पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची मानसिक व अभ्यासाची तयारी पूर्ण करून घेतली जाईल. त्याचसोबत त्याची पदवीही पूर्ण होईल. विद्यार्थ्यांना विद्यापीठातील तज्ज्ञ प्राध्यापकांसह बाहेरील शिक्षकही मार्गदर्शन करणार आहेत.

विद्यापीठाने या अभ्यासक्रमाची क्षमता ४० ठेवली होती. परंतु, पहिल्याच वर्षी उत्तम प्रतिसाद मिळाल्याने ५१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. या अभ्यासक्रमात मार्गदर्शनासह उत्तरे लिहिण्याचे कौशल्य, निबंधलेखन, इंग्रजीची उत्तम जाण, मुलाखतीचे तंत्र, तज्ज्ञ व यशस्वी व्यक्तींशी संवाद तसेच अधिकारी बनण्यासाठी आणि नंतर अधिकारी म्हणून वापरताना आवश्‍यक असलेला व्यक्तिमत्त्व विकास, या गोष्टींचे विशेष मार्गदर्शनही दिले जाणार आहे. तसेच, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेवर आधारित आवश्‍यक शिक्षण तसेच राज्यशास्त्र, भूगोल, इतिहास, समाजशास्त्र, मानवशास्त्र यांसारख्या मुख्य विषयांबाबत सखोल प्रशिक्षण व ‘ई-लर्निंग’ किट उपलब्ध करून दिले जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com