उन्हामुळे विद्यापीठाचे पदवी प्रदान सायंकाळी?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 एप्रिल 2017

पुणे - उन्हाच्या झळांमुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ कधी घ्यायचा? यावर विचार सुरू झाला आहे. हा समारंभ एप्रिल महिन्याच्या अखेरीस बंदिस्त सभागृहात किंवा मुख्य इमारतीच्या मागील बाजूस सायंकाळी घेण्याच्या पर्यायांचा प्रशासन विचार करत आहे.

पुणे - उन्हाच्या झळांमुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ कधी घ्यायचा? यावर विचार सुरू झाला आहे. हा समारंभ एप्रिल महिन्याच्या अखेरीस बंदिस्त सभागृहात किंवा मुख्य इमारतीच्या मागील बाजूस सायंकाळी घेण्याच्या पर्यायांचा प्रशासन विचार करत आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनेनुसार वर्षातून दोन वेळा पदवी प्रदान समारंभ आयोजित करणे बंधनकारक झाले आहे. एरवी सकाळी 11 वाजता हा समारंभ आयोजिला जातो. परंतु, एप्रिल महिन्यात तापमानात वाढ झाल्याने समारंभ कधी आयोजित करायचा, हा प्रश्‍न विद्यापीठासमोर आहे. हा समारंभ सायंकाळी आयोजित करण्यावर शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे आहेत.

पदवी मिळविण्यासाठी सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. परीक्षा विभागातील सूत्रांच्या अंदाजानुसार, सुमारे दीड ते दोन हजार विद्यार्थी प्रत्यक्ष पदवी प्रदान समारंभास उपस्थित राहतील. विद्यार्थ्यांची ही संख्या लक्षात घेता, तेवढी आसनक्षमता असलेले सभागृह विद्यापीठात नाही. त्यामुळे मुख्य इमारतीच्या मागील बाजूस हिरवळीवर हा समारंभ होणार असल्याचे सांगितले जाते.

सुमारे 22 वर्षांपूर्वी याच हिरवळीत वर्षातून दोनदा पदवी प्रदान समारंभ होत असे. नंतर वर्षातून एकदा समारंभ करण्याची प्रथा सुरू झाल्याने विशेष व्यवस्था करून पदव्या दिल्या जात होत्या. याबाबत विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण म्हणाले, ""वाढत्या उन्हामुळे हा समारंभ कधी घ्यावा, हा प्रश्‍न आहे; परंतु कुलगुरूंशी चर्चा करून समारंभ सायंकाळी घ्यायचा की सभागृहात याबाबत निर्णय घेण्यात येईल.'

Web Title: university post graduate degree programme evening