विद्यापीठातील प्रकाशन विभाग टाकणार कात

मीनाक्षी गुरव
रविवार, 30 डिसेंबर 2018

पहिल्या टप्प्यात 25 पुस्तकांच्या पुनर्प्रकाशनाचे काम सुरू आहे. येत्या वर्षात एकूण 70 पुस्तकांचे पुनर्प्रकाशन करण्याचा प्रयत्न आहे. विद्यापीठ येत्या वर्षात 70व्या वर्षात पदार्पण करत असून, यानिमित्त विद्यापीठाचा सत्तर वर्षांतील मागोवा साहित्याच्या रूपाने घेतला जाणार आहे. 

- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 

पुणे : दहा-बारा वर्षांपासून बंद असलेला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रकाशन विभाग आता पुन्हा कात टाकण्याच्या तयारीत आहे. विद्यापीठाने यापूर्वी प्रकाशित केलेली दुर्मीळ ग्रंथ संपदा आणि काही जर्नल्स नव्या वर्षात पुनर्प्रकाशित करण्यात येणार आहेत. त्याशिवाय काही लेखकांनाही लिखाणासाठी प्रोत्साहित करून नव्या पुस्तकांचे प्रकाशन करण्याची तयारी विद्यापीठाने सुरू केली आहे. 

विद्यापीठात साधारणत: 2003च्या आसपास डिजिटलायझेशनास सुरवात झाली. त्यानंतर काही वर्षांत प्रवेश अर्ज, परीक्षा अर्ज, अभ्यासक्रमाची माहिती पुस्तिका डिजिटल स्वरूपात ऑनलाइन उपलब्ध होऊ लागल्या. परिणामी छापील अर्ज, पुस्तिका आणि अन्य पुस्तकांच्या मागणीत तुलनेने घट झाली. काही दुर्मीळ पुस्तकांचे पुनर्प्रकाशनही थांबले. परिणामी दहा-बारा वर्षांपासून विद्यापीठातील हा विभाग बंद होता. मात्र, गेल्या काही वर्षांपासून विद्यापीठातील "आउट ऑफ प्रिंट' पुस्तकांचे खासगीरीत्या पुनर्प्रकाशन करण्यासंदर्भातील परवानगीबाबत काही प्रकाशन संस्थांकडून विद्यापीठाला विचारणा करण्यात येत होती. मात्र, आता विद्यापीठामार्फतच त्या दुर्मीळ पुस्तकांचे पुनर्प्रकाशन करण्यात येणार आहे. 
विद्यापीठाच्या प्रतिष्ठेचा एक अविभाज्य भाग म्हणून प्रकाशन विभागाकडे पाहिले जाते.

त्यामुळे हा विभाग पुन्हा एकदा नव्याने सुरू करण्याची तयारी विद्यापीठाने सुरू केली आहे. आता प्रकाशनातील नवे प्रकारही वापरात आणले जाणार आहेत. त्यासाठी स्क्रीन पेंटिंग, अद्ययावत छपाईचे तंत्र कार्यान्वित करण्यात येत आहे. त्याद्वारे वेगवेगळ्या प्रकारांतील छपाइस सुरवात झाली आहे. नुकत्याच झालेल्या "युवा स्पंदन' या महोत्सवात "कॉफी मग'वर स्क्रीन पेंटिंगचा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आला, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली. 

Web Title: The university publication department will be Renewed