बेवारस वाहने चोरीला अन्‌ पाण्यात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

रस्त्यांवर महिनोन्‌महिने धूळ खात पडलेली सुमारे १२०० बेवारस चारचाकी वाहने महापालिकेने ताब्यात घेतली; पण ही वाहने सांभाळताना महापालिकेच्या नाकीनऊ आले असून, त्यांचा लिलाव करण्यास वाहतूक पोलिसांकडून ‘ग्रीन सिग्नल’ मिळत नाही. यातील काही वाहने चोरीला गेली तर काही वाहने मुठा नदीपात्रातून वाहून गेल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे महापालिकेच्या कारवाईचा उपयोग काय, असा प्रश्‍न विचारला जात आहे.

पुणे - रस्त्यांवर महिनोन्‌महिने धूळ खात पडलेली सुमारे १२०० बेवारस चारचाकी वाहने महापालिकेने ताब्यात घेतली; पण ही वाहने सांभाळताना महापालिकेच्या नाकीनऊ आले असून, त्यांचा लिलाव करण्यास वाहतूक पोलिसांकडून ‘ग्रीन सिग्नल’ मिळत नाही. यातील काही वाहने चोरीला गेली तर काही वाहने मुठा नदीपात्रातून वाहून गेल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे महापालिकेच्या कारवाईचा उपयोग काय, असा प्रश्‍न विचारला जात आहे.

या वाहनांचा लिलाव करण्याचा प्रस्ताव महापालिकेने वाहतूक पोलिसांकडे दिला आहे. त्याला मंजुरी मिळताच पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. शहराच्या वेगवेगळ्या भागांतील जुनी वाहने विशेषत: चारचाकी वाहने पडून असल्याचे दिसून आले. वाहनांची वर्दळ असलेल्या काही रस्त्यांलगतच ही वाहने असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याच्या तक्रारी होत्या. 

या पार्श्‍वभूमीवर प्रमुख रस्ते आणि चौकातील वाहतूक सुरळीत करण्याच्या उद्देशाने अतिक्रमण विभागाने विविध प्रकारची तब्बल पावणेदोन हजार वाहने ताब्यात घेतली. त्यातील सहाशे वाहने मूळ मालकांनी परत नेली. मात्र जी वाहने सोडविण्यासाठी कोणी पुढे आले नाही, त्या वाहनांचा लिलाव करण्याचा उपाय शोधण्यात आला. परंतु महापालिका आणि वाहतूक पोलिस  यांच्यातील समन्वयाअभावी ती पडून राहिली. 

कारवाईतील ही वाहने गेल्या नऊ महिन्यांपासून नदीपात्र आणि महापालिकेच्या काही जागांमध्ये ठेवण्यात आली होती. एवढ्या प्रमाणातील वाहनांवर नियंत्रण ठेवणे शक्‍य नसल्याने काही वाहनांचे सुटे भाग चोरीला गेले. त्यातच नदीपात्रात पाणी सोडल्याने काही वाहने वाहून गेली आहेत. 

बेवारस वाहने महापालिकेच्या ताब्यात आहेत. ती सुरक्षित असून, त्यांचा लिलाव करण्याबाबत वाहतूक पोलिसांशी चर्चा सुरू आहे.
-माधव जगताप, प्रमुख, अतिक्रमण विभाग, महापालिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: unknown vehicles stolen in pune