केमिकल इंजिनियरिंग : आता करिअरच्या अमर्याद संधी...

che
che

पुणे : केमिकल इंजिनियरिंग ही इंजिनियरिंगची एक मूलभूत शाखा आहे. ही शाखा माणसाच्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक गरजेशी संबंधित आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थी व पालक इंजीनियरिंग शाखेला प्रवेश घेताना भविष्यकाळातील करिअरच्या संधी कोणत्या हे पाहूनच इंजिनियरिंगच्या शाखेला प्रवेश घेतात. केमिकल इंजिनिअरिंग ही शाखा 'सर्वस्पर्शी' समजली जाते, म्हणूनच करिअरच्या अनेक संधी या शाखेव्दारे उपलब्ध आहेत. 

केमिकल इंजीनियरिंगशी निगडित तेजीत असणारी क्षेत्रे म्हणजे पेट्रोलियम, पेट्रोकेमिकल, पॅालिमर, प्लास्टिक, फूड टेक्नॉलॉजी, पेपर अँड पल्प टेक्नॉलॉजी, बायोकेमिकल आणि बायोटेक्नॉलॉजी ही होत. ही क्षेत्रे केमिकल इंजिनियरिंगची अविभाज्य घटक आहेत.  
आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टी केमिकल इंजिनिअरिंगशी संबंधित असून त्यामध्ये टूथपेस्ट, साबण, डिटर्जंट, परफ्युम, सौंदर्यप्रसाधने, खाद्यपदार्थ, शीतपेये प्लास्टिकच्या वस्तू, कपडे, कागद, रबर, फायबर, पेन्ट, खते, अल्कोहोल, कीटकनाशके, पेट्रोल, डिझेल, केरोसीन, एलपीजी गॅस अशा कित्येक जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन व निर्मिती केमिकल इंजिनियर करीत असतात. साहजिकच या क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.

अमेरिका, कॅनडा, इंग्लंड नेदरलँड, जर्मनी तसेच अरब राष्ट्रे जसे दुबई, ओमान, बहरीन, कुवेत, इराण, इराक, सौदी अरेबिया इत्यादी राष्ट्रांत केमिकल इंजिनियर्सना नेहमीच संधी उपलब्ध असतात.  भारतातील खाजगी क्षेत्रातील मोठमोठ्या कंपन्या म्हणजेच रिलायन्स इंडस्ट्रीज, युनिलिव्हर ग्रुप, एस्सार, एल अँड टी, दीपक फर्टीलायझर, कॅडबरी, पिडिलाइट, एशियन पेंट्स, फिनोलेक्स, प्राज इंडस्ट्रीज तसेच सरकारी क्षेत्रातील ओएनजीसी, ऑइल इंडिया लिमिटेड, एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसीएल,  इफको, आरसीएफ  इत्यादी कंपन्यांमधून केमिकल इंजिनिअर्सना नोकरीच्या संधी उपलब्ध असतात.  

तसेच पर्यावरण, बायोडीजल, अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत, माॅडेलिंग अँड सिम्युलेशन, पायपिंग, मटेरियल सायन्स, एनर्जी कंजर्वेशन, सँड रिक्लेमेशन, ऊर्जा बचत, सीएफडी इत्यादी क्षेत्रांमध्ये केमिकल इंजिनिअर्स ची मागणी वाढत आहे. 

भारतासारख्या शेतीप्रधान देशात केमिकल क्षेत्राची बायोटेक्नॉलॉजीशी व्यवस्थित सांगड घातल्यास बायोडिझेल, जैविक खते, कीटकनाशके, तणनाशके यांच्या निर्मितीतून मोठ्या हरितक्रांतीसाठी मदत होऊ शकेल. संशोधन क्षेत्रामध्येही या शाखेला खूप वाव आहे. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, बीएआरसी, डीआरडीआे, आयसीटी, आयआयटी व विद्यापीठांमधून मोठ्या प्रमाणावर या क्षेत्रामध्ये संशोधन केले जाते.

केमिकल इंजिनिअरिंगमध्ये प्रवेशाविषयी

बारावीनंतर चार वर्षाच्या या कोर्समध्ये बारावीमध्ये पीसीएम घेऊन जेईई व एमएचटी-सीइटी प्रवेश परीक्षांच्या माध्यमातून सरकारी तसेच खाजगी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेता येऊ शकतो.

सर्वस्पर्शी अशा केमिकल इंजिनियरिंग शाखेमध्ये करिअरच्या अमर्याद संधी उपलब्ध आहेत. या संधींचा पुरेपूर वापर करून प्रगतीची वाटचाल नक्कीच करता येवू शकते.   

डॉ. दिनेश भुतडा 
लेखक :
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com