राष्ट्रवादीला निनावी पत्राचा दणका

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

आधीच पराभव आणि आता पक्षांतराच्या सपाट्यामुळे पिचलेल्या राष्ट्रवादी  काँग्रेसवर निनावी पत्राचा हल्ला झाला आहे. पुण्यातील पक्ष संघटनेतील नव्या नेमणुका करताना केवळ मराठ्यांना स्थान दिल्याचा घणाघात या पत्रातून केलेला आहे.

पुणे : आधीच पराभव आणि आता पक्षांतराच्या सपाट्यामुळे पिचलेल्या राष्ट्रवादी  काँग्रेसवर निनावी पत्राचा हल्ला झाला आहे. पुण्यातील पक्ष संघटनेतील नव्या नेमणुका करताना केवळ मराठ्यांना स्थान दिल्याचा घणाघात या पत्रातून केलेला आहे. स्थानिक नेतृत्वाच्या दाव्याचा दाखला देत, या पत्रात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावरही निशाणा साधलाय. 

पक्षाचे शहराध्यक्ष, खासदार, प्रवक्ते, महापालिकेतील विरोधी पक्षनेता तसेच सात विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष हे मराठा समाजाचे आहेत, याकडे या पत्राने लक्ष वेधले आहे. "पुण्यात पक्षाला गेल्या अनेक वर्षांपासून "पार्ट-टाईम' नेतृत्व मिळाले आहे,' अशी टिप्पणीही पत्रात केली आहे. अशा नेतृत्वामुळेच पक्षाचे वाटोळे झाल्याचा ठपका आजी-माजी पदाधिकाऱ्यांवर ठेवला आहे. 

No photo description available.

हा पत्र हल्ला राष्ट्रवादीच्याच एका निष्ठावंत कार्यकर्त्याचा प्रताप असल्याची चर्चा आहे. 'राष्ट्रवादी मराठ्यांचाच पक्ष' अशा आशयाचे पत्र या कार्यकर्त्याने पक्षाध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नेते अजित पवार यांच्यासह पक्षाचे पुण्यातील पदाधिकारी, नगरसेवकांना 'कुरिअर'ने धाडले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह विविध आघाड्यांच्या नव्या प्रमुखांच्या नावांची घोषणा नुकतीच केली. त्यातील, महिला, युवक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, सोशल मीडिया, कामगार पर्यावरण, पर्यावरण सेल, समन्वयक पदांवरही मराठा समाजातील कार्यकर्त्यांची वर्णी लागल्याचे पत्रात म्हटले आहे. तेव्हा, संघटनेतील अल्पसंख्याक आणि सामाजिक न्याय विभागाची अध्यक्षपदेही मराठा समाजातील कार्यकर्त्यांकडे द्यावे, असा बोचरा सल्लाही या पत्रातून देण्यात आलेला आहे. 'या नियुक्‍यांमुळे राष्ट्रवादी हा मराठ्यांचाच पक्ष आहे. इतर जाती-धर्मातील कायकर्ते-पदाधिकाऱ्यांना कुठलेच स्थान नाही,' हे दाखवून दिल्याबद्दल आभाराचा तिरकस शेराही पत्रात मारण्यात आला आहे. 

No photo description available.

पुणे आणि जिल्ह्यातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका पक्षाचे अजित पवार यांना विचारल्याशिवाय होत नाही, असे पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाकडून सांगितले जाते. तसे असेल तर या नियुक्‍त्या जातीचा विचार करून करण्यात आल्या असाव्यात, असे दिसत असल्याचे पत्रात म्हटले आहे. दुसरीकडे, पक्षात सर्व जाती-धर्माच्या लोकांना स्थान द्या म्हणजे, पक्ष वाढेल,' असे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार नेहमीच सांगतात. तेव्हा नेमणुकांतून विसंगती कशी ? हा पक्ष एका जातीच्या अधिपत्याखाली चालवायचा आणि भविष्यात तो संपवून टाकायचा ? असे खोचक प्रश्‍नही पत्रात विचारण्यात आलेले आहेत. 

विधानसभेची 2014 आणि लोकसभेची 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला. त्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने वैचारिक आणि संघटनात्मक काम करण्यासाठी जबाबदार लोकांची एकही बैठक झाली नाही. शहर कार्यकारिणी जाहीर करून अनेक महिने झाली तरी त्यांची बैठक घेण्यात आलेली नाही. त्याचवेळी प्रमुख विरोधी पक्ष म्हणून पुण्यात कामकाज कसे असावे याचेही स्थानिक नेतृत्वाला भान नाही, असे सर्व मुद्दे नेत्यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न पत्रातून करण्यात आलेला आहे. 

No photo description available.

पक्षाच्या टिळक रस्त्यावरील कार्यालयांत शुकशुकाट असतो. कार्यालयात चार ते पाचच कार्यकर्ते ये-जा करतात. त्यामुळे इच्छा असूनही कार्यकर्त्यांना संघटनेच्या कामात सहभागी होता येत नाही. विद्यमान शहराध्यक्ष चेतन तुपे यांना फार वेळ पक्ष कार्यालयात येणे जमत नाही. ते नगरसेवक असल्याने त्यांना सकाळी प्रभागातील कामे करावी लागतात. त्यामुळे ते दुपारी तीन वाजल्यानंतर कार्यालयात येतात. त्यानंतर ते महापालिकेच्या कामकाजात लक्ष घालतात, अशा शब्दांत पत्रात तुपे यांचा उल्लेख आहे.

पक्ष संघटनेचे कामकाज दिवसेंदिवस ढासळत आहे. परंतु, नेत्यांनी कोणताही "धडा' घेतलेला दिसत नाही. आगामी निवडणुकांत राष्ट्रवादीला शहरात यश मिळणार नाही. पक्षाचा एकही आमदार निवडून येणार नाही. आमदार निवडून येण्याचे सोडा, आहेत ते कार्यकर्तेही टिकवून ठेवण्यात पक्ष नेतृत्व यशस्वी झाले तरी बरे होईल. अशी चिंता‌‌ या पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे. 

No photo description available.

रोज 15 ते 20 कार्यकर्ते घेऊन आंदोलने केल्याने सत्ता मिळत नाही. त्यासाठी सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चळवळ उभारावी लागते. ज्यांच्यासाठी आंदोलने करतो, तो घटक तरी आपल्यासोबत आहे का ? त्या घटकापर्यंत तुम्ही पोचता का ? नेत्यांना दाखविण्यासाठी आंदोलने करायची, फोटो काढायचे, ते व्हायरल करून स्वत:ची पाठ थोपटून घ्यायची. यात स्थानिक नेते यशस्वी होतील; पण पक्षाचे वाटोळे करण्यात तेच अग्रभागी असतील, याचे भान पक्षला कधी येणार ? अशा प्रश्‍न या पत्रातून विचारण्यात आलेला आहे.
 
नेत्यांनी ताबडतोब कठोर उपाययोजना कराव्यात, शहरातील जाणकार व अनुभवी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून यात सुधारणा करावी, अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीनंतर कितीही गंभीर आणि मोठे ऑपरेशन केले तरी पक्ष संघटना कोमात गेलेली दिसेल, अशा शब्दांत पत्राचा शेवट करत पक्ष नेतृत्वाला डोस देण्याचं काम या कार्यकर्त्याने केलं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unnamed Letter to NCP Criticizing on Various NCP Leaders