मतदारांना पैसे वाटणाऱ्या उपसरपंचाच्या भावाकडून पत्रकाराला दमदाटी  

प्रफुल्ल भंडारी
शनिवार, 27 एप्रिल 2019

दौंड (पुणे)  : लिंगाळी (ता. दौंड) येथे मतदारांना पैसे वाटणाऱ्या उपसरपंचाची बातमी दिल्याच्या रागापोटी उपसरपंचाच्या भावाकडून दौंड तालुक्यातील एका पत्रकाराला दमदाटी व शिवीगाळ करण्याचा प्रकार घडला आहे. दौंड तालुका श्रमिक पत्रकार संघाने या बाबत तत्काळ कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. 

दौंड (पुणे)  : लिंगाळी (ता. दौंड) येथे मतदारांना पैसे वाटणाऱ्या उपसरपंचाची बातमी दिल्याच्या रागापोटी उपसरपंचाच्या भावाकडून दौंड तालुक्यातील एका पत्रकाराला दमदाटी व शिवीगाळ करण्याचा प्रकार घडला आहे. दौंड तालुका श्रमिक पत्रकार संघाने या बाबत तत्काळ कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. 

लिंगाळी येथे मतदानकेंद्राबाहेर २३ एप्रिलला लिंगाळीचा उपसरपंच गणेश जगदाळे हा भाजप उमेदवार कांचन कुल यांच्यासाठी मतदारांना पैसे वाटत असल्याने त्याच्यावर कारवाई करण्याची लेखी मागणी अश्विन वाघमारे यांनी निवडणूक आयोग आणि पोलिसांकडे केली होती. या बाबत निवडणूक आयोगाच्या भरारी पथकातील ग्राम विकास अधिकारी विलास भापकर यांनी गणेश जगदाळे याच्याविरूध्द मतदारांना लाच देऊन आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी फिर्याद दिल्यानंतर दौंड पोलिस ठाण्यात २४ एप्रिलला त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान काल (ता. २६) सकाळी गणेश जगदाळे याचा भाऊ उमेश अंकुश जगदाळे (रा. लिंगाळी) याने लोकमतचे बातमीदार मनोहर बोडखे यांना मोबाइल करून 'एवढी मोठी बातमी का दिली ?' असे विचारत अर्वाच्च भाषा वापरली. या बाबत मनोहर बोडखे यांनी आज संध्याकाळी दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील महाडीक यांच्याकडे तक्रार अर्ज देऊन संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दौंड तालुका श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय चव्हाण व संघाच्या सदस्यांनी पोलिस निरीक्षकांची भेट घेऊन मनोहर बोडखे यांना झालेल्या दमदाटी व शिवीगाळ प्रकरणी उमेश जगदाळे याच्याविरूध्द तत्काळ कारवाई करण्याची लेखी मागणी केली. 

 जाबजबाब नंतर उपसरपंचावर आरोपपत्र
पैसे वाटल्याप्रकरणी गणेश जगदाळे याच्याविरूध्द कारवाई करण्यासाठीची परवानगी दौंड पोलिसांनी न्यायालयाकडे मागितली होती. सदर परवानगी मिळाली असून सर्व संबंधितांचे जाबजबाब घेऊन आरोपपत्र न्यायालयात दाखल केले जाईल, अशी माहिती तपास अधिकारी तथा सहायक निरीक्षक ऋषीकेश अधिकारी यांनी दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: upsarpanch brother distributing money to voters and to threatening to journalist