साहेब, आता तरी भाकरी फिरवा 

गजेंद्र बडे
मंगळवार, 30 जुलै 2019

पुणे : "साहेब, येत्या विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा तेच तेच इच्छुक आहेत. पुन्हा जुन्यांनाच उमेदवारी मिळणार असेल, तर नव्या चेहऱ्यांना कधीच संधी मिळणार नाही, असा संदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये गेला आहे. यासाठी, आता तरी भाकरी फिरवा,' असे साकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस जालिंदर कामठे यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांना घातले आहे. 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जालिंदर कामठे यांचे साकडे 

पुणे : "साहेब, येत्या विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा तेच तेच इच्छुक आहेत. पुन्हा जुन्यांनाच उमेदवारी मिळणार असेल, तर नव्या चेहऱ्यांना कधीच संधी मिळणार नाही, असा संदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये गेला आहे. यासाठी, आता तरी भाकरी फिरवा,' असे साकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस जालिंदर कामठे यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांना घातले आहे. 

"राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील नव्यांना संधी देण्यासाठी "एक व्यक्ती, एक पद' हे सूत्र वापरले पाहिजे. यानुसार जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा बॅंक, जिल्हा दूध संघ, सहकारी साखर कारखाने यासारख्या सहकारी संस्थांवर पदाधिकारी किंवा संचालक असलेल्यांना विधानसभेची उमेदवारी देऊ नये,' अशी मागणीही कामठे यांनी पवार यांच्याकडे केली आहे. 

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांच्या मुलाखती नुकत्याच पुण्यात घेण्यात आल्या. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि प्रवक्‍त्या विद्या चव्हाण, पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी या मुलाखती घेतल्या.

बारामती व आंबेगाव मतदारसंघांतून विद्यमान आमदारांशिवाय अन्य कोणीही इच्छुक नसल्याने मुलाखती झाल्या नाहीत. मात्र, उर्वरित आठ मतदारसंघांच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांच्या मुलाखती झाल्या. मात्र, यासाठी सर्वच मतदारसंघांतून जुन्याच चेहऱ्यांनी हजेरी लावल्याचे दिसून आले, असेही कामठे यांनी पत्रात म्हटले आहे. 

याबाबत कामठे म्हणाले, "जुन्याच चेहऱ्यांना पुनःपुन्हा संधी दिली जात असल्याने गावपातळीवरील कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह आहे. आपल्याला कोठेच संधी मिळणार नसेल, तर आपण काय आयुष्याभर सतरंज्याच उचलत बसायच्या का, असा प्रश्‍न कार्यकर्त्यांना पडला आहे. त्यातूनच राष्ट्रवादीतून अन्य पक्षांत जाणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे.'' 

पुरंदर "राष्ट्रवादी'कडेच हवा 
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी होण्याची शक्‍यता आहे. या आघाडीच्या जागावाटपात बारामती लोकसभा मतदारसंघातील पुरंदर विधानसभा मतदारसंघासाठी कॉंग्रेस आग्रही राहील, असे दिसते. मात्र, हा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडेच ठेवा, अशी मागणी कामठे यांनी केली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Urge to Sharad Pawar to change the situation