सुरक्षिततेअभावी कामगारांच्या जिवाला धोका

Fire
Fire

पुणे - उरुळी देवाची परिसरामध्ये दीडशेहून अधिक गोदामे व दुकाने आहेत. संबंधित दुकानांमध्ये तब्बल पाच ते सहा हजार कामगार काम करत आहेत. असे असूनही गोदामे व दुकानचालकांकडून कामगार कायदा अक्षरशः धाब्यावर बसविला जात आहे. कामगारांना सोयीसुविधा पुरविण्यापासून ते त्यांच्या सुरक्षिततेसाठी कुठल्याच उपाययोजना नसल्यामुळे पाच-सहा हजार कामगारांच्या जिवाला धोका असल्याचा निष्कर्ष अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समितीने काढला आहे.

उरुळी देवाची येथील कापड दुकानास आग लागून पाच कामगारांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समितीचे निमंत्रक नितीन पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उरुळी देवाची येथील घटनास्थळासह परिसरातील गोदामे व दुकानांची पाहणी केली.

शिष्टमंडळामध्ये ‘लोकभारती’चे प्रमोद दिवेकर, राकेश नेवासकर, प्रीतम ओस्वाल, हमाल पंचायतीचे रवी पाटोळे, टेम्पो पंचायतीचे भरत गेडेवाड, महात्मा फुले प्रतिष्ठानचे विजय जगताप यांचा समावेश होता. शिष्टमंडळाने उरुळी देवाची येथील ग्रामस्थ, परिसरातील दुकानांमध्ये काम करणारे कामगार, दुकानदार, गोदाम चालक यांच्याशी संवाद साधला.

दरम्यान, संघटनेने व्यापारी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशीही चर्चा केली. त्यांनी आगीच्या घटनेबाबत दुःख व्यक्त केले. तसेच कामगार कायद्यातील नियमांची कामगारांसाठी अंमलबजावणी करणार असल्याचे स्पष्ट केले. 

दरम्यान, शिष्टमंडळाने जिल्हा कामगार उपायुक्त विकास पनवेलकर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे निवेदन दिले. त्यामध्ये पगारी सुटी, कामाचे तास, त्यावरील कामास जादा मोबादला, नियमानुसार किमान वेतन, विमा, आजारपणात उपचाराची सुविधा, भविष्य निर्वाह निधी यांसारखी सामाजिक सुरक्षा योजनांची अंमलबजावणी करून या स्वरूपाचे अपघात टाळण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली.

उरुळी देवाची परिसरातील कामगारांना कामगार कायद्यातील नियमानुसार कुठल्याच सोयीसुविधा, सुरक्षितता दिली जात नसल्याचे पाहणीनंतर स्पष्ट झाले. याबरोबरच कामगारांच्या सुरक्षिततेची काळजी न घेता त्यांच्या जिवाशी खेळ खेळला जात आहे. अशा प्रकारामुळेच पाच जणांना जीव गमवावा लागला.
- नितीन पवार, निमंत्रक, अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com