तंत्रस्नेही शिक्षक अन्‌ क्‍यूआर कोडचा वापर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

वडगाव शेरी - येणाऱ्या काळात शिक्षकांनी माहिती तंत्रज्ञानातील प्रवाहांचे व नव्या संकल्पनांचे ज्ञान अद्ययावत ठेवणे कसे गरजेचे आहे. त्याचा फायदा गुणवत्ता वाढीसाठी कसा होईल, हे सांगणारे शेकडो प्रकल्प खराडीतील शिक्षण उत्सवात पाहण्यास मिळाले. क्‍यूआर कोडचा शिक्षण पद्धतीतील वापर सांगणारा प्रकल्पही या वेळी लक्षवेधी ठरला.  

वडगाव शेरी - येणाऱ्या काळात शिक्षकांनी माहिती तंत्रज्ञानातील प्रवाहांचे व नव्या संकल्पनांचे ज्ञान अद्ययावत ठेवणे कसे गरजेचे आहे. त्याचा फायदा गुणवत्ता वाढीसाठी कसा होईल, हे सांगणारे शेकडो प्रकल्प खराडीतील शिक्षण उत्सवात पाहण्यास मिळाले. क्‍यूआर कोडचा शिक्षण पद्धतीतील वापर सांगणारा प्रकल्पही या वेळी लक्षवेधी ठरला.  

पुणे महापालिकेच्या शिक्षणमंडळाने खराडी येथे आयोजित केलेल्या दोनदिवसीय शिक्षण उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आयुक्त कुणाल कुमार, शिक्षण मंडळ अध्यक्षा वासंती काकडे, प्रशासकीय अधिकारी शुभांगी चव्हाण, उपप्रशासकीय अधिकारी सुलताना मुलाणी, नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक प्रशासकीय अधिकारी एम. आर. जाधव, मनोरमा आवारे, विजय आवारे, पर्यवेक्षक, मुख्याध्यापक, शिक्षक आदी उपस्थित होते. शिक्षण उत्सवात सुमारे साठ स्टॉल्स मांडण्यात आले होते. 

याविषयी चव्हाण म्हणाल्या, ‘‘शिक्षण उत्सवात ज्ञानरचनावाद, गणिती व भाषिक खेळ, स्वयंसेवी संस्थांचा सहभाग, भाषा समृद्धी, शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठीचे उपक्रम, तंत्रज्ञानाचा अध्ययन अध्यापनात उपयोग आदींविषयी प्रकल्प या ठिकाणी सादर करण्यात आले. पुणे शहरातील महापालिकेच्या मराठी, इंग्रजी, उर्दू आणि कन्नड माध्यमाच्या शाळांतील शेकडो शिक्षक या उत्सवात सहभागी झाले होते. तसेच शहरातील इतर खासगी व पालिकेच्या शाळांतील हजारो शिक्षकांनी या उत्सवाला भेट देऊन माहिती घेतली. याचा फायदा शिक्षणाच्या दर्जा वाढीसाठी होईल.’’ 

उत्सवाच्या पहिल्या दिवशी आयुक्त कुणाल कुमार यांच्या हस्ते वर्ग निरीक्षणासाठी बनवण्यात आलेल्या ॲपचे उद्‌घाटन झाले. महापालिकेने पहिल्यांदाच आयोजित केलेल्या या उपक्रमासाठी नगर रस्ता भागातील शिक्षण विभागाने विशेष प्रयत्न केले. या वेळी माजी आमदार बापू पठारे, नगरसेवक महेंद्र पठारे आदी उपस्थित होते. 
 

सुटाबुटातील ‘गुरुजी’
शिक्षण उत्सवात प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करीत मांडलेले प्रकल्प सुटाबुटातील शिक्षक आत्मविश्वासाने सादर करीत होते. क्‍युआर कोडसारखे नवे तंत्रज्ञान, शाळाबाह्य मुलांचे माहितीपट याचेही सादरीकरण काही शिक्षकांनी मोठ्या उत्साहात केले. 

Web Title: the use of QR codes and teacher