तंत्रज्ञानाच्या प्रसाराबरोबर वाढतोय गणिताचा वापर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

पुणे - शालेय जीवनापासून "भीतीदायक' वाटणारं गणित हे चराचरात आहे. झाडांच्या पाना-फुलांची रचना असो वा संगीत आणि आधुनिक तंत्रज्ञान या प्रत्येकात गणित आहेच. सध्याच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या आणि आंतरविद्याशाखीय शिक्षण प्रणालीच्या युगात त्याचा अधिक विस्तार आणि वापर करून घेतला जात आहे.

पुणे - शालेय जीवनापासून "भीतीदायक' वाटणारं गणित हे चराचरात आहे. झाडांच्या पाना-फुलांची रचना असो वा संगीत आणि आधुनिक तंत्रज्ञान या प्रत्येकात गणित आहेच. सध्याच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या आणि आंतरविद्याशाखीय शिक्षण प्रणालीच्या युगात त्याचा अधिक विस्तार आणि वापर करून घेतला जात आहे.

महान गणित तज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीदिनी, 22 डिसेंबर हा राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने गणिताच्या तज्ज्ञांनी या विषयाचे सध्याच्या काळातील महत्त्व विषद केले. कला, वाणिज्य, विज्ञान, तंत्रज्ञान अशी कोणतीच शाखा नाही की, जिथे गणिताचा वापर होत नाही. बदलत्या विज्ञान तंत्रज्ञानामुळे सर्वच विद्याशाखांमधील संशोधन, प्रश्‍नांची उकल हे सैद्धांतिक पातळीवर थांबून राहिलेले नाही.

प्रत्यक्षात त्याचे उपयोजन आणि संशोधनाचे वापरायोग्य तंत्रज्ञानात रूपांतर ही काळाची गरज बनली आहे. त्यामुळे प्रत्येक संशोधनात अचूक निष्कर्षापर्यंत पोचावे लागते. हे सर्व ते गणिताशिवाय शक्‍य नाही.

विद्याशाखांचे स्वतंत्र स्थानही आता राहिलेले नाही. शिक्षणात आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन जोमाने वाढीला लागला आहे. त्यामुळे गणिताचे स्थानही सर्वच विद्याशाखांमध्ये अविभाज्य बनले आहे. अर्थशास्त्र असो की वित्तीय व्यवस्था ही क्षेत्रे वा शाखांना गणिताशिवाय पूर्णत्व येत नाही. माहिती तंत्रज्ञान कंपन्यादेखील गणित विषयातील पदवीधरांना प्राध्यान्याने पसंती देऊ लागल्या आहेत.

गणिताचे प्राध्यापक डॉ. यशवंत बोरसे गणिताच्या महत्त्वाविषयी बोलताना म्हणाले, 'गणित हा विषय जुनाच असला, तरी त्यातील संशोधन आणि त्याचे उपयोजन यांचा वेगाने विस्तार होत आहे. सध्या गणिताशी निगडित असलेला ग्राफ थिअरीचा वापर विशेषत: संगणक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होत आहे. "क्‍लाऊड कॉम्प्युटिंग' इत्यादींसाठी त्याचा उपयोग करून घेतला जात आहे.''

पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप सेठ हे गणिताचे प्राध्यापक आहेत. ते म्हणाले, 'कोणतीच विद्याशाखा गणितापासून दूर राहिलेली नाही. माहिती-तंत्रज्ञान, संगणक, समाजशास्त्रे या सर्व विद्याशाखांमध्ये गणित आहेच. या शाखांच्या विकासाबरोबर त्याचा अधिक विस्तार होत आहे. तंत्रज्ञानाच्या वापरातून संगणक प्रणाली विकसित झाल्याने विविध विषयांतील संशोधन आणि प्रश्‍नांची उकल करणे शक्‍य होऊ लागले आहे. त्यामुळे अचूक निष्कर्षापर्यंत पोचता येते.'' गणित दिवसानिमित्त सर परशुरामभाऊ महाविद्यालयात शनिवारी (ता. 24) गणिताचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. त्यामध्ये 41 मॉडेल पाहायला मिळतील. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे, अशी माहितीदेखील डॉ. सेठ यांनी दिली.

Web Title: The use of technology in the mathematics publicity