संगीत का कोई मजहब नहीं होता...

सुशांत सांगवे @sushantsangwe
रविवार, 11 डिसेंबर 2016

पुणे : ‘‘फूल, हवा, पाणी, अग्नी, खुशबू, रंग इनका कोई मजहब नहीं होता. फिर भी हर मजहब को इनकी जरूरत होती हैं. वैसे ही संगीत का हैं. संगीत का कोई मजहब नहीं होता...’’ सांगत होते ख्यातनाम सरोदवादक उस्ताद अमजद अली खाँ. संगीत हे आपल्यातील भिंती बाजूला करून एकमेकांना जोडणारे, शांततेचा गंध फुलवणारे माध्यम आहे. आज आपण एकमेकांशी जोडले गेलेलो आहोत ना, ते संगीतामुळेच... असेही ते सांगत होते.

पुणे : ‘‘फूल, हवा, पाणी, अग्नी, खुशबू, रंग इनका कोई मजहब नहीं होता. फिर भी हर मजहब को इनकी जरूरत होती हैं. वैसे ही संगीत का हैं. संगीत का कोई मजहब नहीं होता...’’ सांगत होते ख्यातनाम सरोदवादक उस्ताद अमजद अली खाँ. संगीत हे आपल्यातील भिंती बाजूला करून एकमेकांना जोडणारे, शांततेचा गंध फुलवणारे माध्यम आहे. आज आपण एकमेकांशी जोडले गेलेलो आहोत ना, ते संगीतामुळेच... असेही ते सांगत होते.

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या स्वरमंचावरून अमजद अली खाँ आपले पुत्र अमान आणि अयान अली बंगश यांच्यासोबत सरोदवादन सादर करणार आहेत. पिता-पुत्रांची एकत्रित अशी ही अनोखी मैफल रविवारी (ता. ११) अनुभवायला मिळणार आहे. यानिमित्ताने ‘सकाळ’ने अमजद अली खाँ यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या सरोदवादनातून येणाऱ्या स्वरलहरी जशा मनाला स्पर्शून जातात तसे त्यांचे शब्दही या वेळी मनात घर करून जात होते.

अमजद अली खाँ म्हणाले, ‘‘संगीत ही सात स्वरांची दुनिया आहे; पण आपण संगीतावर भाषा लादण्याचा प्रयत्न करतो. भाषेतून संगीत मांडण्याचा प्रयत्न करतो. ध्रुपद, ख्याल, लोकसंगीत असे निरनिराळे कप्पे करतो. वेगवेगळे भेद पाडत राहतो. तरीसुद्धा या संगीताच्या दुनियेने अख्ख्या जगाला जोडून ठेवले आहे. आजवर अनेक गायक-वादकांनी एकमेकांना जोडण्याचेच काम केले आहे. शास्त्रीय संगीतात येणारी नवी पिढीसुद्धा हाच धागा घेऊन वाटचाल करताना मी पाहतो, त्या वेळी मोठे समाधान मिळते.’’

शास्त्रीय संगीत शाळेपासून शिकवायला हवे, असे अनेक जण म्हणतात; पण संगीत किंवा कोणतीही कला हा सक्तीचा किंवा जबरदस्तीचा विषय करणे योग्य नाही. शास्त्रीय संगीतापेक्षा आधी लोकसंगीत शिकवायला हवे. लोकसंगीत काय असते, हेच सध्या कोणाला माहिती नाही. लोकसंगीत समजले तरच संगीत उत्तमरीत्या समजून घेता येऊ शकते, असे सांगून अमजद अली खाँ म्हणाले, ‘‘संगीतात येणारी नवी पिढी ‘इलेक्‍ट्रीक’शी जोडली गेलेली आहे. इलेक्‍ट्रॉनिक म्युझिक किंवा फ्युजन हे काही वाईट नाही; पण जो रियाज करेल, साधना करेल तोच यशाच्या शिखरावर पोचेल. प्रसिद्धिमाध्यमांची मदत घेऊन यश मिळवू पाहणारे कलाकार या महासागरात जास्त दिवस टिकत नाहीत.’’

रुखरुख आणि आनंद
‘‘मारवा आणि पूरिया हे एकाच सुरांचे दोन राग आहेत; पण यात नेमका फरक काय? हे मला अमजद अली खाँ यांच्या वडिलांनी समजावून सांगितले, असे पंडित भीमसेन जोशी नेहमी सांगायचे. गुलजारजींनी केलेल्या माहितीपटातही पंडितजींनी या घटनेचा उल्लेख केला आहे. पंडितजी हे माझे ‘गुरुबंधू’ होते. ते नाहीत याची रुखरुख मनात कायम आहे; पण त्यांनी सुरू केलेल्या ‘सवाई’त सेवा सादर करण्याची संधी मिळते, याचा आनंदही आहे,’’ असे अमजद अली खाँ यांनी सांगितले. अनेकदा पंडितजींच्या घरी गेलो आहे. त्यांच्या घरी बनवला जाणारा दहीभात मी अजूनही विसरलेलो नाही, अशी आठवणही त्यांनी सांगितली.

‘नोटाबंदी’मुळे मिळेल नवी दिशा
‘नोटाबंदी’च्या निर्णयाबाबत अमजद अली खाँ म्हणाले, ‘‘माझा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्‍वास आहे. त्यांनी विचारपूर्वकच हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सध्या नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. बॅंकेच्या बाहेर रांगेत थांबावे लागत आहे. हे कितीही खरे असले तरी या निर्णयामुळे देशाला पुढे नवी दिशा मिळणार आहे. येणाऱ्या नव्या पिढीसाठी हा निर्णय खरोखरच चांगला आहे; पण तुमच्याप्रमाणेच मीही ‘अच्छे दिन’च्या प्रतीक्षेत आहे.’’

Web Title: ustad ahmed ali khan