मुलीच्या इच्छापूर्तीसाठी आईकडून गर्भाशय दान 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

पुणे - देशाच्या वैद्यकीय इतिहासातील पहिली गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पुण्यातील गॅलेक्‍सी केअर लॅप्रोस्कोपी इन्स्टिट्यूटमध्ये गुरुवारी झाली. आपल्या मुलीची आई होण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी एका आईने मुलीला दान केलेले गर्भाशय येथे प्रत्यारोपित करण्यात आले. 

पुणे - देशाच्या वैद्यकीय इतिहासातील पहिली गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पुण्यातील गॅलेक्‍सी केअर लॅप्रोस्कोपी इन्स्टिट्यूटमध्ये गुरुवारी झाली. आपल्या मुलीची आई होण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी एका आईने मुलीला दान केलेले गर्भाशय येथे प्रत्यारोपित करण्यात आले. 

देशातील पहिल्या गर्भाशय प्रत्यारोपणाकडे देशातील वैद्यकीय जगताचे लक्ष लागले होते. दुपारी साडेबारा वाजता सुरू झालेली ही शस्त्रक्रिया रात्री सव्वानऊ वाजेपर्यंत सुरू होती. या दरम्यान या शस्त्रक्रियेच्या यशाकडे लक्ष होते. गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे गॅलेक्‍सी केअर लॅप्रोस्कोपी इन्स्टिट्यूटचे प्रमुख डॉ. शैलेश पुणतांबेकर यांनी रात्री उशिरा "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

डॉ. पुणतांबेकर म्हणाले, ""गर्भाशय प्रत्यारोपणाची अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. सुमारे दहा तास ही शस्त्रक्रिया सुरू होती. त्यात दान केलेले गर्भाशय काढून रुग्णाच्या शरीरात प्रत्यारोपित करण्यात आले.'' 

सोलापूर जिल्ह्यातील 21 वर्षीय मुलीला जन्मतः गर्भाशय नव्हते. तिच्या विवाहानंतर काही वर्षांनी याचे निदान झाले. पण त्या मुलीला स्वतःचे मूल असावे अशी प्रबळ इच्छा होती. तिची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी तिच्या आईने गर्भाशय दान करण्याचा निर्णय घेतला. त्या बाबतच्या वैद्यकीय तपासण्या केल्यानंतर दान केलेले गर्भाशयाचे यशस्वी प्रत्यारोपण करता येईल, असा विश्‍वास डॉक्‍टरांना होता. त्यासाठी परदेशातील काही डॉक्‍टरांचाही सल्ला त्यात घेण्यात आला. गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता आईच्या शरीरातील गर्भाशय काढण्याची पहिली शस्त्रक्रिया सुरू झाली. सुमारे साडेचार तास ही शस्त्रक्रिया सुरू होती. त्यानंतर हे गर्भाशय मुलीच्या शरीरात प्रत्यारोपित करण्यात आले, अशी माहिती रुग्णालयातर्फे देण्यात आली. 

शस्त्रक्रियेनंतरचे तीन आठवडे सर्वांत महत्त्वाचे आहेत. शरीर हे गर्भाशय या काळात स्वीकारेल. या काळात गर्भाशयाला होणारा रक्तपुरवठा व्यवस्थित आहे का, यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे, असेही येथील डॉक्‍टरांनी सांगितले. 

गर्भाशय दान केलेल्या आईला आणि प्रत्यारोपण केलेल्या मुलीला पुढील दोन दिवस अतिदक्षता विभागात ठेवण्यात येईल. त्यानंतर तीन आठवडे त्यांना तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

या प्रत्यारोपणामुळे महिलेला स्वतःचे बाळ जन्माला घालणे शक्‍य होणार आहे. या हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तज्ज्ञांच्या पथकातील डॉ. शैलेश पुणतांबेकर, डॉ. संजीव जाधव, डॉ. पंकज कुलकर्णी आणि डॉ. मिलिंद तेलंग यांनी स्वीडनला जाऊन गर्भाशयाच्या प्रत्यारोपणाची माहिती घेतली होती. 

गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया दुपारी साडेबाराच्या सुमारास सुरू झाली. रात्री सव्वानऊच्या सुमारास शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. यामध्ये बारा तज्ज्ञ डॉक्‍टरांचा समावेश होता. 

पुढे काय होईल? 
गर्भाशय प्रत्यारोपण केलेल्या मुलीचे स्त्रीबीज काढून जतन करून ठेवले आहे. हे स्त्रीबीज पुढील काही महिन्यांनी मुलीच्या गर्भाशयात सोडण्यात येईल. त्यानंतर तिला गर्भधारणा होऊन तिची आई होण्याची इच्छा पूर्ण होईल. यानंतर त्या गर्भाशयाचे काम राहणार नसल्याने ते परत काढण्यात येणार असल्याचेही येथील डॉक्‍टरांनी सांगितले. 

Web Title: Uterine donation by the mother for the girl's wish

टॅग्स