# Vaccination लस सरकारी यंत्रणेमार्फतच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

पुणे - सध्या गोवर- रुबेला लस फक्त सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून दिली जात आहे. खासगी डॉक्‍टर किंवा रुग्णालयांमधून ही लस मुलांना देण्यात येत नाही, असे सार्वजनिक आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. याबरोबर काही बालरोगतज्ज्ञांकडे दिली जाणारी ‘एमएमआर’ लसदेखील पुढील महिनाभर दिली जाणार नसल्याची माहिती ‘इंडियन ॲकॅडमी ऑफ पेडियाट्रिक’च्या पुणे शाखेने दिली. 

पुणे - सध्या गोवर- रुबेला लस फक्त सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून दिली जात आहे. खासगी डॉक्‍टर किंवा रुग्णालयांमधून ही लस मुलांना देण्यात येत नाही, असे सार्वजनिक आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. याबरोबर काही बालरोगतज्ज्ञांकडे दिली जाणारी ‘एमएमआर’ लसदेखील पुढील महिनाभर दिली जाणार नसल्याची माहिती ‘इंडियन ॲकॅडमी ऑफ पेडियाट्रिक’च्या पुणे शाखेने दिली. 

गोवर- रुबेलाची ही लस गेल्या काही महिन्यांपूर्वी खासगी डॉक्‍टरांकडून घेतली असल्यास सरकारी लस घेण्याची गरज  नाही, अशा प्रकारची चर्चा पालकांमध्ये आहे. या  पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ’ने सार्वजनिक आरोग्य विभाग, महापालिका आणि बालरोगतज्ज्ञ संघटनेशी संपर्क साधल्यानंतर या सर्वांतर्फे वरील स्पष्टीकरण देण्यात आले. महापालिका लसीकरण विभागाचे प्रमुख डॉ. अमित शहा म्हणाले,  शहरातील ४२८ शाळांमधील एक लाख ८० हजार विद्यार्थ्यांना लस देण्यात आली आहे.

गोवर- रुबेला ही लस फक्त सरकारी यंत्रणेतूनच दिली जात आहे. त्यासाठी शीतसाखळी व्यवस्थापन करण्याच्या यंत्रणेचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. खासगी बालरोगतज्ज्ञांनी ही लस द्यावी याबाबतचा कोणताही निर्णय झाला नाही.  
- डॉ. अर्चना पाटील, अतिरिक्त संचालक, कुटुंब कल्याण विभाग 
 
केंद्राकडून आलेली ही लस शाळेतील विद्यार्थ्यांना दिली जात आहे. खासगी डॉक्‍टरांकडे ही लस उपलब्ध करून दिली नाही, त्यामुळे ही लस फक्त सरकारी यंत्रणेतून दिली जात आहे. 
- डॉ. रामचंद्र हंकारे, प्रमुख, महापालिका आरोग्य विभाग 

शहरातील काही बालरोग तज्ज्ञ ‘एमएमआर’ही लस आतापर्यंत देत होते. सध्या गोवर- रुबेला (एमआर) लसीकरण मोहीम सुरू आहे. ‘एमएमआर’ आणि ‘एमआर’ या दोन्ही लसी एकाच वेळी देणे मुलांसाठी वैद्यकीयदृष्ट्या योग्य नाही. त्यामुळे ‘एमएमआर’ ही लस पुढील महिनाभर मुलांना न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- डॉ. संजय ललवाणी, अध्यक्ष, इंडियन ॲकॅडमी ऑफ पेडियाट्रिक (पुणे शाखा)  

लस सुरक्षितच 
पोलिओ राज्यातून हद्दपार करण्यात यश मिळाल्यानंतर लहान मुलांमधील गोवर आणि रुबेला हे आजार देशातून घालविण्यासाठी केंद्र सरकारने या दोन्ही आजारांना प्रतिबंध करेल, अशी एक लस शाळकरी मुलांना देण्याचा निर्णय घेतला आहे. गोवर- रुबेला लस दिल्यानंतर काही मुलांना ताप येणे, पुरळ अशी रिॲक्‍शन येते. पण, त्यातून कोणतीही गुंतागुंत झाल्याची घटना घडलेली नाही. त्यामुळे लस सुरक्षित असून, ही लस पालकांनी आपल्या मुलांना द्यावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे करण्यात आले आहे. 

Web Title: vaccine Only through the Government system