असली सुफीयाँना आजकल किसे हैं पता?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 एप्रिल 2017

वडाली बंधू यांची खंत; सुफी संगीताच्या परंपरा जपण्याचा सल्ला

वडाली बंधू यांची खंत; सुफी संगीताच्या परंपरा जपण्याचा सल्ला

पुणे - ‘‘जो असली सुफीयाँना गाना हैं, वह आजकल के बच्चों को कहाँ पता?... वे तो बस गाते चलें जाते है! कुछ चटपटा गा लिया, इसका मतलब सुफी गाना नहीं होता! दूध और घी में जो अंतर हैं, वह हमें समझ में आना चाहीयें! असली सुफी गाना हमें भगवान से मिलता हैं...’’ आपल्या बुलंद आणि ऊर्जित गायकीने सुफी गायनाला जगभरात नाव मिळवून दिलेली संगीत-बंधुद्वयी अर्थात ‘वडाली बंधू’ यांचे हे हृदयातून आलेले उद्‌गार. संत कबीर, बाबा बुल्लेशाह या आपल्या पूर्वसूरींनी जो रस्ता दाखवलाय, तोच सुफी परंपरेचा खरा रस्ता, असंही ते आवर्जून सांगत होते. 

‘विरसा’ या संगीतसंध्येत आपलं गायन सादर करण्यासाठी शनिवारी (ता.२२) पुण्यात आलेल्या वडाली बंधूंनी, अर्थात पूरनचंद आणि प्यारेलाल वडाली यांनी पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. सुफी संगीत हे एखाद्या दागिन्याला घडवण्यासारखं आहे. ते तावून सुलाखूनच जपलं गेलं पाहिजे, असं त्यांनी आवर्जून सांगितलं. आपल्या गाण्याविषयी वडाळी बंधू म्हणाले, ‘‘आम्ही श्रोत्यांचा मूड पाहतो आणि मग गातो. त्यामुळे एखादी मैफल प्रत्यक्ष सुरू होईपर्यंत खुद्द आम्हालासुद्धा माहीत नसतं की, आम्ही आज काय गाणार ते. अर्थात, एकदा मैफलीत बसलं आणि श्रोत्यांशी असणारं ते सांगीतिक रसायन तयार झालं की, गाणं आपोआप आकार-उकार घेत जातंच. गाताना आम्ही श्रोत्यांची दाद नव्हे, तर आमच्या गुरूंची शिकवण डोळ्यांपुढे ठेवत असतो. गाणं हे प्रसिद्धीसाठी नाहीच. ती तर परमेश्वराला घातलेली साद आहे. जब किसी की दिल को चोट लगती है ना, तब वह सच्चा गाना बाहर आता हैं।’’

बडे गुलाम अली खाँसाहेबांचं गाणं चिरंतन टिकणारं
पूरनचंद वडाली म्हणाले, ‘‘बडे गुलाम अली खाँसाहेबांच्या गायकीचे संस्कार घेऊनच माझी सांगीतिक वाटचाल पुढे गेली. त्यांच्या ‘याद पियाँ की आयें’सारख्या अनेक रचना आजही तश्‍शाच आपलं स्थान टिकवून आहेत. खरंतर, त्या चिरंतन टिकणाऱ्याच आहेत. त्यांचं गायन एखाद्या फुलबाजीसारखं चटकन विरून जाणारं नव्हतं... ते तर एखाद्या उद्‌बत्तीसारखं होतं- आपला सुगंध सर्वत्र पसरवत राहणारं!’’

Web Title: vadali brothers talking