वडगाव नगरपंचायतीसाठी ७८ टक्के मतदान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जुलै 2018

वडगाव मावळ - वडगाव नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीसाठी रविवारी (ता. १५) मतदारांनी भर पावसातही रांगा लावून मतदान केले. संततधार पावसाचा कार्यकर्ते तसेच मतदारांच्या उत्साहावर कोणताही परिणाम झाला नाही. एकूण मतदानाचा आकडा ७८.१८ टक्क्यांपर्यंत पोचला. मतदानाची प्रक्रिया शांततेत सुरू होती.

वडगाव मावळ - वडगाव नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीसाठी रविवारी (ता. १५) मतदारांनी भर पावसातही रांगा लावून मतदान केले. संततधार पावसाचा कार्यकर्ते तसेच मतदारांच्या उत्साहावर कोणताही परिणाम झाला नाही. एकूण मतदानाचा आकडा ७८.१८ टक्क्यांपर्यंत पोचला. मतदानाची प्रक्रिया शांततेत सुरू होती.

वडगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदाच्या १७ जागांसाठी रविवारी निवडणूक घेण्यात आली. नगराध्यक्षपदासाठी सहा, तर नगरसेवकपदासाठी ४७ उमेदवार रिंगणात होते. मतदानासाठी विविध सतरा ठिकाणी १७ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरवात झाली. रविवारी पहाटेपासून पावसाची संततधार सुरू होती. परंतु, या पावसातही छत्र्या, रेनकोट घालून मतदार मतदानासाठी घराबाहेर पडले. पहिल्या दोन तासांत मतदानाचा वेग काहीसा कमी होता. या काळात पंधरा टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

त्यानंतर मतदानाचा वेग वाढला. सकाळी साडेअकरापर्यंत ३३ टक्के, तर दीड वाजेपर्यंत ५३ टक्के मतदान झाले. दुपारी साडेतीनपर्यंत हा आकडा ६९ टक्के होता.  ७,५९६ पैकी ५,९०८ पुरुषांनी मतदान केले. तर ७,१४० पैकी ५,६१२ महिलांनी असे एकूण ११,५२० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.  एरवी रविवारच्या दिवशी शासकीय कार्यालये बंद असल्याने बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येतो. मात्र मतदानामुळे संततधार पावसातही कार्यकर्त्यांच्या गर्दीने बाजारपेठ फुलली होती. वाहनांचीही मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे वाहतूक कोंडीही होत होती. बाजारपेठेत ठिकठिकाणी उमेदवारांचे बूथ उभारण्यात आले होते. तेथे मतदारांचे मतदार यादीतील क्रमांक शोधून देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. बूथवर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. त्यात महिला व तरुण कार्यकर्त्यांचा लक्षणीय सहभाग होता. मतदान केंद्रांबाहेर उमेदवार हात जोडून मतदारांना विनम्र अभिवादन करताना दिसून येत होते. प्रत्येक प्रभागातील उमेदवारांचे समर्थक घराघरांत जाऊन मतदारांना मतदानासाठी बाहेर पडण्यास प्रवृत्त करत होते. पावसामुळे मतदारांसाठी वाहनांचीही व्यवस्था त्यांनी केली होती. निवडणुकीतील चुरस लक्षात घेऊन पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. ध्वनिक्षेपक लावलेली पोलिस व्हॅन बाजारपेठेतून सातत्याने फेरफटका मारून सूचना करत होती. त्यामुळे मतदानाची प्रक्रिया शांततेत सुरू होती. या निवडणुकीबाबत संपूर्ण तालुक्‍यात उत्सुकता असल्याने विविध पक्षाच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी येथे भेट देऊन मतदानाचा कानोसा घेतला.

क्षणचित्र
 सकाळी साडेअकरापर्यंत मतदान : ३३ टक्के
 दुपारी दीडपर्यंत मतदान : ५३ टक्के
 पुरुषांचे मतदान : ५९०८
 महिलांचे मतदान : ५६१२
 एकूण मतदान ः ११,५२०

Web Title: vadgaon nagarpanchyat election