तालुक्‍याच्या गावाला कृत्रिम पाणीटंचाईचे ग्रहण

जांभूळ - येथील इंद्रायणी नदीवर वडगाव शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यातून होत असलेली पाण्याची गळती.
जांभूळ - येथील इंद्रायणी नदीवर वडगाव शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यातून होत असलेली पाण्याची गळती.

वडगाव मावळ - पाण्याची उपलब्धता असतानाही जुन्या वितरण व्यवस्थेमुळे वडगाव शहराच्या काही भागांतील नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. पाणीपुरवठ्याबाबतच्या तक्रारी व शहराची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या लक्षात घेऊन येथील पाणीपुरवठा योजनांची पुनर्रचना करण्याची गरज निर्माण झाली आहे. विशेषतः पाणी साठवण व वितरण व्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्याची आवश्‍यकता आहे.

वडगाव हे मावळ तालुक्‍याचे मुख्य ठिकाण असल्याने येथे विविध शासकीय कार्यालये आहेत. येथील ग्रामपंचायतीची स्थापना १९२२ मधील आहे.

वर्षभरापूर्वी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाले आहे. कातवी गावाचाही नगरपंचायतीत समावेश आहे. पन्नास वर्षांपूर्वी येथील लोकसंख्या अत्यल्प असताना गावाला दोन विहिरीतून होणारा पाणीपुरवठाही पुरेसा होत होता. सुमारे चाळीस वर्षांपूर्वी येथे जांभूळ गावाजवळ इंद्रायणीनदीतून पहिली पाणी योजना करण्यात आली. त्यासाठी नदीवर बंधारा बांधण्यात आला होता.

येथून उचलण्यात आलेले पाणी सिमेंटच्या जलवाहिन्यांद्वारे शिंदे टेकडी येथे बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीत साठवून गावाला पाणीपुरवठा होऊ लागला. वाढत्या लोकसंख्येची गरज लक्षात घेऊन इंद्रायणी नदीवरच सांगवी व कातवी येथे आणखी दोन पाणी योजना करण्यात आल्या. पाणी साठविण्यासाठी विविध भागांत टाक्‍याही बांधण्यात आल्या. सद्यःस्थितीत शिंदेटेकडी, संस्कृती सोसायटी, ठाकरवस्ती (डेक्कन हिल्स), दलितवस्ती, हरणेश्‍वर टेकडी, म्हाळसकर वस्ती, कातवी येथे आठ पाणीसाठवण टाक्‍या आहेत. केशवनगर येथे पाणीसाठवण टाकीचे काम सध्या सुरू आहे. तिन्ही पाणी योजनेतून दररोज सुमारे बारा लाख लिटर पाणी उचलून ते या टाक्‍यांत साठवले जाते व तेथून विविध भागांना पाणीपुरवठा केला जातो. शिंदेटेकडी व संस्कृती सोसायटीजवळील टाक्‍यांनाच शुद्धीकरण यंत्रणेची व्यवस्था आहे. काही भागांना सकाळी, तर काही भागांना संध्याकाळी असा दररोज सुमारे एक तास पाणीपुरवठा केला जातो.

उपनगराध्यक्षा, पाणीपुरवठा सभापती अर्चना म्हाळसकर म्हणाल्या, ‘‘आणखी एक पाणीयोजना करण्यासाठीही नगरविकास खात्याकडे पाठपुरावा केला जात आहे. सद्यःस्थितीत एकाच पाणीपुरवठा योजनेला शुद्धीकरणाची व्यवस्था आहे. आगामी काळात तीनही योजनांना ही यंत्रणा बसवून संपूर्ण शहराला शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे.’

भविष्यातील सुमारे पन्नास हजार लोकसंख्या लक्षात घेऊन उपाययोजना करण्यात येत आहेत. येत्या वर्षभरात ही सर्व कामे पूर्ण होतील व शहराच्या सर्व भागांत मुबलक पाणीपुरवठा होईल. सद्यःस्थितीत केशवनगर येथील टाकीचे काम येत्या महिनाभरात पूर्ण झाल्यानंतर शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा सुरळीत होईल.
- मयूर ढोरे, नगराध्यक्ष, वडगाव नगरपंचायत

सध्याची स्थिती
शहराची लोकसंख्या पंचवीस ते तीस हजारांवर
औद्योगिक वसाहतींतील कामगार वर्गाचे वाढते वास्तव्य
केशवनगर, डोंगररांगेजवळ, एमआयडीसी रस्त्यावर गृहप्रकल्पांत वाढ
मुख्य वाहिनीतून पुरवठा होत असल्याने उशिरापर्यंत पाणीवितरण
काही भागांत कमी दाबाने व कमी वेळ पाणीपुरवठा
ठाकरवस्ती (डेक्कन हिल्स), टेल्को कॉलनी, चव्हाणनगर, कुडेवाडा, चव्हाणवाडा, पंचमुखी मारुती, केशवनगर, म्हाळसकरवस्तीमधील काही भागातील नागरिकांच्या तक्रारी

उपाययोजना
लोकसंख्येनुसार पाणीपुरवठा योजनांची पुनर्रचनेची गरज
साठवण व वितरण व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणा करणे आवश्‍यक
इंद्रायणी नदीवर बांधण्यात आलेला नवी बंधारा बांधाव्यात
फुटणाऱ्या सिमेंटच्या जलवाहिन्या तसेच गंजलेल्या लोखंडी जलवाहिन्या बदलाव्यात
ठाकरवस्ती (डेक्कन हिल्स) व हरणेश्‍वर टेकडी परिसरात अधिक क्षमतेच्या टाक्‍या बांधाव्यात
विस्तारलेल्या भागात नवीन जलवाहिन्या टाकाव्यात
वीजपुरवठ्यावर अवंलबून न राहता अधिक क्षमतेचे ट्रान्स्फॉर्मर बसविण्याची गरज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com