वडगावात पहिल्या अर्थसंकल्पातून करदिलासा

Vadgav-Nagarpanchyat
Vadgav-Nagarpanchyat

वडगाव मावळ - वडगाव नगरपंचायतीचा २०१९-२० या आर्थिक वर्षासाठीचा कोणतीही करवाढ व दरवाढ नसलेला ५० कोटी ५३ लाख ५४ हजार ५०० रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. ६ लाख ३५ हजार रुपये शिलकीचा हा अर्थसंकल्प असून त्यात कोणतीही करवाढ सुचविण्यात न आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. नगरपंचायतीच्या स्थापनेनंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प असल्याने त्याबाबत मोठी उत्सुकता होती.

अर्थसंकल्प सादरीकरणासाठी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली या सभेचे आयोजन करण्यात आले होते. उपनगराध्यक्षा अर्चना म्हाळसकर यांच्यासह सर्व विषय समित्यांचे सभापती व नगरसेवक उपस्थित होते. मुख्याधिकारी सुवर्णा ओगले यांनी सभागृहात अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शहरातील स्वच्छतेसोबत विविध भांडवली योजनांकरिता भरीव तरतूद करण्यात आली. नगरपंचायतीने यावर्षी कोणतीही करवाढ न करता विविध शासकीय निधी, अनुदाने व पालिकेच्या विविध करांच्या माध्यमातून शहर विकसित व स्वच्छ करण्याचे धोरण आखले आहे. लेखाधिकारी ज्ञानेश्‍वर मोहिते यांनी अंदाजपत्रकाचे वाचन केले.

अर्थसंकल्पात ११ कोटी ५० लाख ३७ हजार महसुली जमा व ३९ कोटी ३ लाख १७ हजार ५०० रुपये भांडवली जमा तसेच १० कोटी ५५ लाख ३७ हजार व ३९ कोटी ९२ लाख १० हजार रुपये भांडवली खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. 

अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांना ओगले व ढोरे यांनी उत्तरे दिली. नगरसेविका पूजा वहिले यांनी शाळा, अंगणवाडी दुरुस्तीसाठीच्या तरतुदीबाबत विचारणा केली. सुनीता भिलारे यांनी महिला सक्षमीकरणासाठी भरीव तरतूद नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. ही तरतूद करण्याची मागणी केली. प्रवीण चव्हाण यांनी नगरपंचायतीने घनकचरा व्यवस्थापनासाठी केलेल्या तरतुदीप्रमाणे त्वरित अंमलबजावणी होण्याची गरज व्यक्त केली. 

किरण म्हाळसकर यांनी नगरपंचायतीच्या इमारतीसाठी किती तरतूद केली अशी विचारणा केली. राजेंद्र कुडे यांनी दिवाबत्ती व नवीन पथदिवे बसविण्यासाठी खांबांसाठी ठोस तरतूद आवश्‍यक असल्याचे सांगितले. विजय जाधव यांनी सीसीटीव्हीसाठी किती तरतूद केली अशी विचारणा केली. या सभेत पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा जवानांना श्रद्धांजली 
वाहण्यात आली.

जमा खर्चाचा ताळेबंद (रुपयांत) 
  महसुली जमा - ११ कोटी ५० लाख ३७ हजार 
  भांडवली जमा - ३९ कोटी ३ लाख १७ हजार ५०० 
  प्राथमिक शिलकीत जमा - ५० कोटी ५३ लाख ८२ हजार 
  महसुली खर्च - १० कोटी ५३ लाख ३७ हजार
  भांडवली खर्च - ३९ कोटी ९२ लाख १० हजार

विकासकामांसाठीचा निधी (रुपयांत)
  रस्ते बांधकाम - ५ कोटी ६७ लाख
  गटारे व नाले बांधकाम - ६६ लाख
  विद्युतकाम - १ कोटी २८ लाख
  पाणीपुरवठा - ६३ लाख
  वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी - ५ कोटी
  चौदावा वित्त आयोग - ३ कोटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com