बीआरटीतील घुसखोरांवर कारवाईचा दंडुका; एकसष्ट वाहनांवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बीआरटीतील घुसखोरांवर कारवाईचा दंडुका; एकसष्ट वाहनांवर कारवाई

नगर रस्ता बीआरटी मार्गात खासगी वाहने घुसखोरी करत असल्यामुळे रोज सकाळ संध्याकाळी मोठी वाहतूक कोंडी होते.

बीआरटीतील घुसखोरांवर कारवाईचा दंडुका; एकसष्ट वाहनांवर कारवाई

वडगाव शेरी - बीआरटी मार्गात घुसखोरी करणाऱ्या वाहनांवर विमानतळ वाहतूक विभागाने धडक कारवाई करत छत्तीस हजार रुपये दंड वसूल केला. बीआरटी सुरक्षा विभाग आणि विमानतळ वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. बीआरटी मार्गात घुसखोरी करणाऱ्या वाहनांवर अशी कारवाई नियमित सुरू राहणार आहे.

नगर रस्ता बीआरटी मार्गात खासगी वाहने घुसखोरी करत असल्यामुळे रोज सकाळ संध्याकाळी मोठी वाहतूक कोंडी होते. विमाननगर चौक, इनॉर्बिट चौक, टाटा गार्ड रूम चौक, चंदननगर, खराडी बायपास, दर्गा चौक आणि आपले घर सोसायटी या सर्व चौकात खाजगी वाहने बीआरटी मार्गात सर्रास घुसखोरी करतात.

अशी घुसखोरी थांबवण्यासाठी पीएमपीएल विभागाने काही जागी सुरक्षारक्षक नेमले आहेत. परंतु खाजगी वाहन चालक या सुरक्षा रक्षकांना जुमानत नाहीत.

हक्काचा मार्ग असूनही पीएमपीएलच्या बसगाड्या वाहतूक कोंडीत अडकून पडतात. एका मागे एक बस अडकल्यामुळे चौकातच बसची रांग लागते आणि वाहतूक कोंडी वाढत जाते. त्यामुळे बीआरटी मार्गात घुसखोरी करणाऱ्या खाजगी वाहनचालकांना धडा शिकवण्यासाठी आणि शिस्त लावण्यासाठी आजपासून कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे.

बीआरटी मार्गात घुसखोरी करणाऱ्या वाहनांवर नियमित कारवाई व्हावी. बीआरटी मार्ग सुरू होतो तेथे सूचनाफलक व सुरक्षा चिन्ह लावावेत. तेव्हाच बीआरटी मार्गातील घुसखोरी थांबेल, अपघातही टळतील आणि वाहतूक कोंडी होणार नाही.

- अब्दुल शेख (वडगाव शेरी)

बीआरटी मार्गात घुसखोरी करणाऱ्या 61 खाजगी वाहनांवर कारवाई करून 36 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यापुढेही कारवाई नियमित सुरू राहील.

- संतोष सोनवणे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विमानतळ वाहतूक विभाग)

टॅग्स :policecrimeVehicleBrt