पुणेरी पोहे अन्‌ पुरणपोळी...वाजपेयींचा आवडता मेनू

0Atal_20Bihari_20Vajpayee.jpg
0Atal_20Bihari_20Vajpayee.jpg

पुणे : ओलं खोबर पेरलेले पोहे अन्‌ साजूक तुपाची धार असलेली पुरणपोळी, हा अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुणे दौऱ्यातील आवडता मेनू असायचा. पुण्यात कोठेही उतरले तरी या पदार्थांचा आस्वाद घेतल्याशिवाय त्यांना चैन पडत नव्हते.... सांगत होते दत्तात्रेय चितळे. वेगवेगळ्या पदांवर असतानाही वाजपेयी यांच्या वागण्यात साधेपणा होता अन्‌ तो कायम भावला.... असेही त्यांनी नमूद केले. 

अटलबिहारी वाजपेयी पुण्यात आल्यावर बहुतेक वेळा आपटे रस्त्यावरील हॉटेल श्रेयसमध्ये उतरत असे. त्याचे कारण म्हणजे या हॉटेलचे संचालक बाळासाहेब चितळे अन्‌ वाजपेयी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्षाच्या वर्गात नागपूरमध्ये 1943 मध्ये एकत्र होते. तेव्हापासून त्यांची मैत्री होती. तिचे धागे 1996 पर्यंत टिकले.

वाजपेयी 1980 ते 1996 पर्यंत अनेकदा चितळे यांच्या हॉटेलमध्ये उतरले. उतरल्यावर त्यांचा कोणताही बडेजाव नसे. सकाळी सहा वाजता योगासने झाल्यावर सात-साडेसात वाजण्याच्या सुमारास त्यांची न्याहरी होई. त्यात त्यांना पुणेरी पद्धतीचे पोहे जाम आवडत. त्यावर ओलं खोबरे असेल, तर त्यांची मुद्रा अधिक उजळत. पोह्यांबरोबरच त्यांना पुरणपोळीही आवडत असल्याची आठवण बाळासाहेब चितळे यांचे पुत्र दत्तात्रेय चितळे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितली. पंतप्रधान झाल्यावर ते राजभवन किंवा विरोधी पक्षनेते असताना हॉटेलमध्ये उतरत. परंतु, तेथेही त्यांना पोहे अन्‌ पुरणपोळीची आठवण येत असे. महाराष्ट्रीय चमचमीत खाद्यपदार्थ त्यांना आवडत, असे चितळे यांनी नमूद केले. 

वाजपेयी येणार असल्याचे समजल्यावर त्यांच्यासाठी सर्वोत्तम खोली राखून ठेवली जायची. मराठी चित्रपट, नाटके ते आवडीने पाहत. जनसंघाची स्थापना 1952 मध्ये पुण्यात प्रभात थिएटरमधील सभागृृहात झाली. त्यानंतर सायंकाळी खोलीवर परतताना त्यांना टांगा-रिक्षा मिळाली नाही. तेव्हा बाबुराव किवळकर या मित्रासमवेत वाजपेयी चितळे यांच्या घरी पायी गेले व रात्री आवडीने वरण-भात खाल्ला होता, अशीही आठवण त्यांना सांगितले. 

अडवानींच्या वाढदिवस 
भारतीय जनता पक्षाची नोव्हेंबर 1995 मध्ये पुण्यात राष्ट्रीय कार्यकारीणी होती. 8 नोव्हेंबरला लालकृष्ण अडवानी यांचा वाढदिवस होता. त्या दिवशी हॉटेलमध्ये वाढदिवस आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात वाजपेयी यांनी उत्साहाने सक्रिय सहभाग घेतला होता. तसेच तेव्हा नरेंद्र मोदीही उपस्थित होते. वाढदिवसाची धामधूम सुरू असताना, एका कोपऱ्यात बसून मोदी हे विविध प्रांतांमधील संघटनात्मक बांधणीचा आढावा घेत होते, असे चितळे यांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com