वाकडला चक्क मोटारीच्या उजेडात अंत्यसंस्कार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जुलै 2019

वाकड हा उच्चभ्रू व आयटीयन्सच्या वास्तव्याचा भाग ओळखला जातो. मात्र, येथे मूलभूत सुविधांच्या कमतरतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत.

हिंजवडी (पुणे) : वाकड परिसरात विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त झाले असतानाच येथील स्मशानभूमीतील वीजपुरवठा खंडित झाल्याने चक्क मोटारीच्या दिव्यांच्या उजेडात अंत्यसंस्कार करण्याची नामुष्की वाकड ग्रामस्थांवर आली. हा प्रकार गुरुवारी (ता. 18) रात्री घडला.
वाकड हा उच्चभ्रू व आयटीयन्सच्या वास्तव्याचा भाग ओळखला जातो. मात्र, येथे मूलभूत सुविधांच्या कमतरतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. वाकड येथील रायकर परिवारातील एकाचा मृत्यू झाला. अंत्ययात्रा गावठाणातून स्मशानभूमीकडे जात असतानाच अनेक ठिकाणी खोदकाम केल्याने रस्त्यावर राडारोडा पडला आहे. अंत्ययात्रा स्मशानभूमीत पोचताच बत्ती गुल झालेली होती. अखेरीस मोटारीच्या दिव्यात अंत्यसंस्कार करावे लागले. त्यामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागला.

याबाबत राम वाकडकर म्हणाले, ""नगरसेवकांचे प्रभागात लक्ष नाही. त्यांना प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यापेक्षा आमदारकीची स्वप्ने पडू लागली आहेत. स्मशानभूमीत तीनही शिफ्टमध्ये काम करणारे कर्मचारी असतात. तरीही स्मशानभूमी परिसर नेहमी अस्वच्छ असतो. याकडे प्रशासनाने व स्थानिक नगरसेवकांनी जातीने लक्ष देण्याची गरज आहे.'' याबाबत नगरसेवक राहुल कलाटे म्हणाले, ""रस्त्याचे काम करताना अनेक ठिकाणी वीजवाहिन्या तुटल्या आहेत. त्यामुळे दुरुस्तीसाठी गावठाणातील पुरवठा खंडित झाला होता. महावितरणच्या दिरंगाईमुळे नागरिकांना नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vakad citizens cremates under car headlights