व्हॅलेंटाइन डे 2019 : मान्य कर मना प्रेमात पडलाय तू...

Valentine Day
Valentine Day

पिंपरी - ‘चेहरा तिचा आठवून 
मनामधी हसत असशील,
तिचाच विचार करत 
एकटा एकटा बसत असशील,
इतक्‍या स्ट्राँग नेटवर्कनं
जर तिच्यासोबत जोडलाय तू, मान्य कर मना

प्रेमात पडलाय तू...’ अशा शब्दांत डॉ. स्वप्नील चौधरी यांनी ‘प्रेमात पडण्याची लक्षणे’ कवितेतून मांडली. निमित्त होते ‘सकाळ माध्यम समूह’ आणि औद्योगिक शिक्षण मंडळ (एएसएम) यांनी ‘व्हॅलेंटाइन डे’निमित्त बुधवारी (ता. १३) आयोजित प्रेमकाव्य मैफलीचे. ‘सकाळ’च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कचेही (यिन) या उपक्रमाला सहकार्य लाभले.  

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पिंपरी-चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे अध्यक्षस्थानी होते. डॉ. चौधरी यांनी तावडी व मराठवाडी बोलीत चारोळ्या सादर करून प्रेमकाव्य मैफलीत रंगत आणली. मित्र-मैत्रिणींवर प्रभाव पाडण्यासाठी ‘लिननचा शर्ट हवा’ असा वडिलांकडे आग्रह धरणाऱ्या मुलाच्या भावना विडंबनातून आणि ‘प्रेमी युगलांसाठी आरक्षण पाहिजे...’ असा प्रस्ताव उपरोधिक काव्यातून सविता इंगळे यांनी मांडला. संगीता झिंजुरके यांनी पती-पत्नीतील नात्याची गुंफण प्रेम व विनोदातून मांडली. नीलेश म्हसाये यांनी प्रेमविषयक चारोळ्या, गझलांमधील शेर आणि काव्यओळींच्या संगतीने सूत्रसंचालन करीत ‘मोबाईल नसता तर...’ आणि ‘चहूकडे गुलाबाचं रान दिसतं का? तू म्हणत होती ते हेच असतं का?...’ अशा भावना व्यक्त केल्या. दिनेश भोसले यांनी, ‘नसिले हे दोन डोळे किती हळुवार मिटते तू...’ आणि ‘तू हसतेस तेव्हा तो कोसळून जातो...’ या गझल सादर केली. ‘सुरांना भाळले नाही...’ अशा शब्दांत सुहास घुमरे यांनी प्रेमभावना व्यक्त केल्या. ‘जेव्हा परतून वसंत येतो...’ या रचनेतून त्यांनी भावनांचा फुलोरा फुलविला. अनिल नाटेकर यांनी ‘तुझ्या त्या नयनबाणांनी घायाळ मज केले...’ या रचनेसह लावणी सादर केली.

प्रेम, विनोद, हास्य...
राजन लाखे यांनी प्रेम आणि नातं यांतील भावनिकता अधोरेखित केली. ते म्हणाले, ‘‘प्रेम झालं म्हणजे नातं होईल असं नाही; परंतु नातं निर्माण झाल्यानंतर प्रेम करावं लागतं. कारण नातं टिकविण्यासाठी प्रेम महत्त्वाचं असतं.’’ ‘आला वादळ वारा, आल्या पावसाच्या धारा...’, ‘तुझ्या रंगात रंगून जाण्यात मजा आहे...’ या रचनांमधून त्यांनी प्रेम व्यक्त केले. ‘याची चाल हळू हळू, वरचे केस लागले गळू...’ या विडंबनाने हास्याचे फवारे उडाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com