'ज्ञानगंगा वाहिनी'च्या निर्मितीत पुण्यातील डीईएसचे मोलाचे योगदान

'ज्ञानगंगा वाहिनी'च्या निर्मितीत पुण्यातील डीईएसचे मोलाचे योगदान

पुणे -  कोरोनामुळे शाळा, महाविदयालये बंद असली तरी दहावी आणि बारावीच्या राज्यातील अधिकाधिक विद्यार्थ्यापर्यंत ऑनलाइन शिक्षण पोहोचावे यासाठी सुरू केलेल्या 'जिओ ज्ञानगंगा' या वाहिन्यांच्या निर्मितीत पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) शंभरहून अधिक शिक्षक आणि प्राध्यापक मोलाचे योगदान देत आहेत.

देशात पहिले लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी संस्थेने ऑनलाइन शिक्षण पद्धती विकसित करण्यासाठी तातडीने पावले उचलली होती. पहिल्याच टप्प्यात बहुतांश शिक्षकांचे प्रशिक्षणही पूर्ण झाले होते. अशावेळी शिक्षण विभागाकडून विविध विषयांच्या तासिकांचे व्हिडीओ निर्मितीबाबत संस्थेकडे विचारणा करण्यात आली. शिक्षण विभागाने दिलेल्या प्रस्तावाला संस्थेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, उपाध्यक्ष महेश आठवले, कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी आणि नियामक मंडळातील सर्वच सदस्यांनी एका दिवसात मान्यता दिली. या व्हिडिओ निर्मितीच्या प्रकल्पात संस्थेच्या प्रबंधक डॉ. सविता केळकर यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (एससीईआरटी) उपसंचालक विकास गरड हे शासनाकडून समन्वयक म्हणून काम पाहात आहेत.

इयत्ता दहावीसाठी मराठी व इंग्रजी माध्यम आणि इयत्ता बारावीसाठी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांसाठी व्हिडीओ अभ्यासक्रमाच्या तासिका निर्माण करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. न्यू इंग्लिश स्कूल रमणबागच्या मुख्याध्यापिका तिलोत्तमा रेड्डी यांच्याकडे दहावी मराठी माध्यमाची आणि डीईएस इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका ज्योती बोधे यांच्याकडे दहावी इंग्रजी माध्यमाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. संस्थेच्या आजीव सदस्या डॉ. केळकर यांच्याकडे बारावी कला, बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ यांच्याकडे बारावी वाणिज्य प्रमुख व रूपाली देशपांडे यांच्याकडे सहायक आणि फर्ग्युसन कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य नारायण कुलकर्णी यांची बारावी विज्ञान शाखेचे प्रमुख आणि जयश्री पाटील यांची सहायक म्हणून नियुक्ती केली आहे. नुकतेच 'जिओ ज्ञानगंगा' या शैक्षणिक वाहिन्यांचे उदघाटन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते झाले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या काळात प्रवास आणि एकत्र येऊन चर्चा करण्यावर येणाऱ्या मर्यादा, अध्यापनाचे नवीन माध्यम असल्याने येणारा तणाव, संवादासाठी समोर विद्यार्थी नसल्याने होणारी घालमेल, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही सहज समजेल अशी सोप्या भाषेतील मांडणी, शिकविताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी या सर्व समस्यांवर यशस्वीपणे मात करीत विषयांचा सखोल अभ्यास, प्रदीर्घ अनुभव, शिकविण्याची हातोटी, सादरीकरणाची कला आणि तंत्रज्ञान व आधुनिक संपर्क साधनांचा प्रभावी वापर करून प्रकल्पाचे काम निम्म्याहून अधिक पूर्ण करण्यात आले आहे.

"शिक्षण विभागाच्या या प्रकल्पात डेक्कन एज्युकेशन सोसायटीने एप्रिल महिन्यापासूनच शिक्षक, प्राध्यापकांना व्हर्च्युअल क्लासरूमचे प्रशिक्षण देण्यात आले. त्याचा निश्चितच आता फायदा होत आहे. जिओ ज्ञानगंगा या शैक्षणिक वाहिन्यांसाठी सध्या बालचित्रवाणीमधील स्टुडिओमध्ये चित्रीकरण सूरू आहे. 'एससीईआरटी'च्या मार्गदर्शनाखाली हे चित्रीकरण करण्यात येत आहे. संस्थेतील शिक्षक नेमून दिलेल्या तासिकांप्रमाणे चित्रीकरणासाठी जात आहेत."
-ज्योती बोधे, मुख्याध्यापिका, डीईएस इंग्लिश मिडियम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com