‘वंदे भारत’चे सारथ्य पुण्याच्या हाती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Motorman

मुंबई-सोलापूरदरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसची नुकतेच बोर घाटात चाचणी झाली. पुणे रेल्वे विभागाचे चालक गायकवाड व गुलाबसिंह जाठव यांनी ही चाचणी यशस्वी केली.

Vande Bharat Express : ‘वंदे भारत’चे सारथ्य पुण्याच्या हाती

- प्रसाद कानडे

पुणे - आतापर्यंत लाखो किलोमीटर रेल्वे चालवली. वंदे भारत एक्स्प्रेस चालविण्याचे प्रशिक्षणदेखील घेतले. मात्र चाचणीचा दिवस वेगळाच होता. गाडी सुसाट तर होतीच; शिवाय बोर घाटात गाडी चालविण्याचे आव्हानदेखील होते. देशातील सर्वांत जास्त चढण व तीव्र उतार असलेला हा बोर घाट. जिथे ब्रेकवरून हात जरी सेंकदासाठी बाजूला काढला, तर गाडी वेगाने मागे येते. अशा बोर घाटात पहिल्यांदाच विना ‘बँकर’ (मागून लावलेले इंजिन) वंदे भारतने सुसाट चढण पार केली. असा थरारक तितकाच विलक्षण अनुभव ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसचे सारथ्य केलेले पुण्याचे रेल्वेचालक रणधीर गायकवाड आणि गुलाबसिंह जाठव यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितला.

मुंबई-सोलापूरदरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसची नुकतेच बोर घाटात चाचणी झाली. पुणे रेल्वे विभागाचे चालक गायकवाड व गुलाबसिंह जाठव यांनी ही चाचणी यशस्वी केली आणि त्यांच्या आनंदाला पारावर उरला नसल्याचे गायकवाड यांनी सांगितले. मुख्य लोको (इंजिन) निरीक्षक नरेश कुमार व सी. आर. कळसे हे उपस्थित होते.

कसा आहे बोर घाट

मुंबई-पुणे लोहमार्गावर कर्जत-लोणावळा सेक्शनमध्ये बोर घाट लागतो. मुंबईहून पुण्याला येताना चढण आहे, तर पुण्याहून-मुंबईला जाताना तीव्र उतार आहे. हा २८ किमीचा भाग आहे. यात ५२ बोगदे आहेत. देशातील सर्वांत जास्त चढण व तीव्र उतार असलेला हा मार्ग आहे. खंडाळा-मंकीहिलदरम्यान २.७ किमीचा देशातील सद्यःस्थितीतला दुसऱ्या क्रमांकाच्या लांबीचा बोगदा आहे. कोकण रेल्वे सुरू होण्यापूर्वी हा बोगदा देशातील पहिल्या क्रमांकाच्या लांबीचा बोगदा म्हणून ओळखला जात होता. या बोगद्याचे दुसरे वैशिष्ट असे की हा इंग्रजीतील ‘एस’ शब्दाच्या आकाराचा आहे.

वंदे भारत एक्स्प्रेस चालविण्यासाठी पुणे विभागाच्या सहा चालकांना गाझियाबाद येथे प्रशिक्षण देण्यात आले. मात्र बोर घाटात रेल्वे चालविणे अत्यंत आव्हानात्मक आहे. मात्र पुणे विभागाच्या चालकाने यशस्वीरीत्या ती जवाबदारी पार पाडली. पुणे विभागासाठी ही गौरवशाली बाब आहे.

- ज्वेल मॅकेन्झी, वरिष्ठ विभागीय यांत्रिक व्यवस्थापक, पुणे रेल्वे

कशी आहे ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस

  • गाडीची ताशी १६० किमी वेगाने धावण्याची क्षमता

  • ५४ सेकंदांत ताशी १३० किमी वेग घेण्याची क्षमता

  • ‘कवच’ या सुरक्षाप्रणालीचा अंतर्भाव, त्यामुळे रेल्वेचा समोरासमोर अपघात होणार नाही. रेल्वे एकमेकांसमोर येण्यापूर्वी ३ किमीला आधीच थांबते.

  • इंजिन समोर, प्रत्येक डब्यात, दरवाजावर सीसीटीव्ही कॅमेरे

टॅग्स :punerailwaydriver