वाराणसी, जम्मूतावी गाड्यांना उशीर 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 नोव्हेंबर 2016

पुणे - मध्य रेल्वेच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका शुक्रवारी वाराणसीला जाणाऱ्या प्रवाशांना बसला. पुण्याहून सुटणारी पुणे-वाराणसी गाडी तब्बल 28 तास उशिराने सोडण्यात आली. जम्मूतावी-पुणे ही गाडी 36 तास उशिरा आल्याने पुणे-वाराणसी गाडीला उशीर झाल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यामध्ये मात्र प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. 

पुणे - मध्य रेल्वेच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका शुक्रवारी वाराणसीला जाणाऱ्या प्रवाशांना बसला. पुण्याहून सुटणारी पुणे-वाराणसी गाडी तब्बल 28 तास उशिराने सोडण्यात आली. जम्मूतावी-पुणे ही गाडी 36 तास उशिरा आल्याने पुणे-वाराणसी गाडीला उशीर झाल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यामध्ये मात्र प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. 

उत्तर भारतात छटपूजेसाठी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेत मध्य रेल्वेने पुणे-वाराणसी, पुणे-जम्मूतावी अशा हॉलिडे स्पेशल गाड्या सुरू केल्या आहेत. यापैकी जम्मूतावी-पुणे ही गाडी पुण्याला येते. त्यानंतर हीच गाडी पुणे-वाराणसी असा प्रवास करते. मात्र, जम्मूतावीहून पुण्याला निघालेली गाडी 36 तास उशिराने पुणे स्थानकावर आली. जम्मूतावी-पुणे गाडी बुधवारी रात्री नऊ वाजून 15 मिनिटांनी पुणे स्थानकावर येणे अपेक्षित होते. मात्र, ती शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास येथे आली. त्यानंतर साफसफाई करून आणि गाडीत पाणी भरून आज (शुक्रवारी) दुपारी एक वाजून 36 मिनिटांनी ही गाडी प्लॅटफॉर्मवर आणण्यात आली. त्यानंतर दोन वाजून 15 मिनिटांनी ती मार्गस्थ करण्यात आली. मात्र, या सर्व गोंधळामुळे वाराणसीला जाणाऱ्या प्रवाशांना तब्बल 28 तास ताटकळत बसावे लागले. 
या संदर्भात प्रवासी आशिष चौधरी म्हणाले, ""आम्हाला रेल्वे प्रशासनाने कुठलीही मदत केली नाही. आम्ही फुरसुंगी भागात राहतो. आम्हाला रेल्वे प्रशासनाने एसएमएस करून कळवले. मात्र, गाडी किती वाजता निघणार हे सांगितले नाही. त्यामुळे आम्हाला 28 तास प्लॅटफॉर्मवर बसून राहावे लागले. रेल्वे प्रशासनाने तीन वेळेस चुकीची माहिती दिली. सहा वाजता गाडी आहे, असे सकाळी सांगण्यात आले. त्यानंतर सकाळी अकरा वाजता गाडी येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, ही गाडी दुपारी दोन वाजून 15 मिनिटांनी सोडण्यात आली.'' 

जम्मूतावी गाडीतील प्रवाशांचे हाल 
रेल्वे प्रशासनातर्फे विविध सणावारांसाठी हॉलिडे स्पेशल गाड्या सोडण्यात येतात. मात्र, नियमित गाड्या आधी सोडल्या जातात. त्यामुळे हॉलिडे स्पेशल गाड्यांना नेहमी उशीर होतो. जम्मूतावी-पुणे गाडीला सिग्नल न मिळाल्याने या गाडीला 36 तास उशीर झाला. त्यामुळे या गाडीतील प्रवाशांना जेवण आणि खाण्यापिण्याच्या अडचणी निर्माण झाल्या. 

Web Title: Varanasi, Jammu trains late