वरंधा घाट आणखी दोन महिने बंद

Varandha
Varandha

भोर (पुणे) : भोर-महाड मार्गावर गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेला वरंधा घाटातील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने मार्ग आणखी दोन महिने बंद राहणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. यामुळे भोरमार्गे कोकणात जाण्यासाठी प्रवाशांना पुढील वर्षी जानेवारी महिन्याअखेरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

मार्ग अद्यापही सुरू न झाल्याने नागरिकांचे, प्रवाशांचे, पर्यटकांचे आणि विशेषतः शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. चार ऑगष्टला मुसळधार पावसामुळे वरंधा घाटात चार ठिकाणी रस्ता खचून आणि अनेक ठिकाणी दरडी कोसळून मार्ग बंद झाला. घाटातील भोरच्या हद्दीतील शिरगाव आणि उंबार्डे या दोन ठिकाणी तर महाडच्या हद्दीतील माझेरी गावाजवळ व घाटमाथ्याशेजारील पारमाची अशा दोन ठिकाणी रस्ता खचला. त्यामुळे हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. ऑक्‍टोबर महिन्यात पाऊस संपल्यानंतर नोव्हेंबर महिन्याच्या सुरवातीस ही रस्त्याची कामे सुरू झाली आहेत.

महाड बाजूकडील मार्गासाठी आठ कोटींचा निधी मंजूर झाला असून पहिल्या टप्प्यात तीन कोटी निधी मिळालेला आहे, तर भोर बाजूकडील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी एक कोटी 75 लाख रुपये मंजूर झाले आहेत. सध्या दोन्ही बाजूंकडील कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. परंतु महाड बाजूकडील कामे मोठ्या प्रमाणात असल्याने त्या कामासाठी आणखी दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे महाडचे उपअभियंता बप्पा बहीर यांनी सांगितले. भोर बाजूकडील काम हे एक महिन्याचा आत पूर्ण होणार असल्याचे भोरचे उपअभियंता ए. आ. ठाणगे यांनी सांगितले. याशिवाय घाटातील भोर बाजूकडील 27 किलोमीटर रस्त्यासाठी नऊ कोटी रुपये मंजूर असून तेही काम सुरू करण्यात आल्याचेही ठाणगे यांनी सांगितले.


वरंधा घाटातील पर्यटन बंद
दिवाळीच्या सुट्टीच्या कालावधीत भोरमार्गे महाडला जाणारे आणि फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या हजारोंच्या घरात असते. परंतु यावर्षी मार्गच बंद असल्याने वरंधा घाटातील पर्यटन बंद झाले आहे. त्यामुळे केवळ स्थानिक विक्रेतेच नाही तर घाटमाथ्यावरील माकडांनाही याची झळ पोचली आहे. केवळ दुचाकीवरून येणारे धाडसी पर्यटकच घाटातील पर्यटनाचा आनंद घेत आहेत. याशिवाय या मार्गावरून भोरला येणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य वेळी वाहन मिळत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com