वरसगाव लाँच सेवेची ‘झुंज’ बंद (व्हिडिओ)

Jhunj Launch
Jhunj Launch

पिरंगुट - मोसे खोऱ्यातील वरसगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील लाँच अनुदानाअभावी बंद असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. जिल्हा परिषदेने इंधन व चालकाच्या मानधनासाठी लागणारे अनुदान मंजूर न केल्याने ही लाँच धरणाच्या पाण्यात हेलकावे खात पडून आहे. या लाँचला लागणारे इंधन आणि चालकाच्या मानधनासाठी जिल्हा परिषदेने निधी तातडीने मंजूर करावा आणि लाँचसेवा सुरू करावी, अशी मागणी मोसे खोऱ्यातील रहिवाशांनी केली आहे. याबाबत रहिवासी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

येथील रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, वरसगाव ते गडले या लाँचला अनुदान नसल्याने लाँच बंद अवस्थेत पडून आहे. सामा मरगळे, बाळू गायकवाड, प्रभाकर पासलकर, बाबू ठिकडे, बाळासाहेब पासलकर, विश्राम मोरे, मारुती पासलकर, सामा ठिकडे, विठ्ठल मोरे, नामदेव पवार, तुकाराम वाघमारे आदी प्रवासी दुसऱ्या दिवशी दोन वाजता चालत घरी पोचले. उपाशीपोटी पानशेतला झोपले. 

जिल्हा परिषदेची ही ‘झुंज’ प्रवासी लाँच वरसगाव जलाशयात सुरू झाल्याने मोसे खोऱ्यातील ग्रामस्थांनी समाधान व आनंद व्यक्त केला होता. रोज दुपारी तीन वाजता ही लाँच वरसगाववरून निघून गडले (ता. मुळशी) येथे मुक्काम जात होती. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता निघून वरसगावला पोचत होती. सुरवातीला गणेश पवार व रवींद्र मरगळे यांनी पदरमोड करून दोन हजार रुपये डिझेलसाठी खर्च केले आहेत.

वरसगाव येथील लाँचच्या इंधनासाठी एक लाख रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी पुणे येथील जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता यांच्याकडे लेखी स्वरूपात केलेली आहे. परंतु अद्याप हे अनुदान न आल्याने ही लाँच बंद आहे. 
- बापूसाहेब पाटील, उपअभियंता, जिल्हा परिषद, बांधकाम उपविभाग  

वरसगावची लाँच सुरू करण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी सूचना सुप्रिया सुळे यांनी आम्हाला केली होती. त्यानुसार पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाशी सतत पाठपुरावा करीत आलो आहोत. मात्र, अनुदान मंजूर न झाल्याने ही लाँच बंद आहे. ती सुरू करण्यासाठी आजही आम्ही जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करीत आहोत. 
- अंजली कांबळे, जिल्हा परिषद सदस्य

उत्पन्न
वरसगाव ते गडलेदरम्यान सहा ते सात गावांमध्ये उतरण्यासाठी लाँचला थांबावे लागते. साईव, मोसे, तव, आडमाळ, वडवली व गडले आदी प्रमुख गावांचा त्यात समावेश आहे. या गावांपैकी मोसे व तव गावात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वांत जास्त आहे. या प्रवासात रोज जाताना वीस ते पंचवीस, तसेच येताना वीस ते पंचवीस प्रवाशांचा समावेश आहे. गावाच्या अंतरानुसार तिकिटाचे दर आहेत. ४, ८, १५, १७, २० व ३० रुपये असे तिकिटाचे दर आहेत. प्रवासी संख्या व तिकिटाचा विचार केल्यास तिकिटांपासून रोज सरासरी पाचशे रुपये उत्पन्न मिळते. महिन्याभरासाठी सुमारे बारा ते तेरा हजार रुपये प्रवाशांकडून भाड्यापोटी उत्पन्न मिळते.

खर्च
वरसगाव ते गडले या दरम्यानच्या अंतरासाठी रोज किमान ३० लिटर डिझेल लागते. दर सोमवारी लाँचला सुटी असते. त्यामुळे महिनाभरासाठी सरासरी ६० हजार रुपयांचे डिझेल लागते. त्यातील प्रवासी भाड्याचे उत्पन्न वजा केल्यास सुमारे पंचेचाळीस ते पन्नास हजार रुपये दरमहा इंधन खर्च होतो. चालकाला दरमहा १२ हजार रुपये पगार दिला जातो. म्हणजेच प्रवाशांच्या भाडे तिकिटाच्या सुमारे १२ हजार रुपयांतून चालकाचा पगार भागतो. 

सुळे यांच्या प्रयत्नांमुळे सेवा सुरू
खासदार सुप्रिया सुळे यांना मोसे खोऱ्यातील रहिवाशांनी लाँच चालू करण्याबाबत निवेदन दिले होते. त्यानंतर सुळे यांनी जिल्हा परिषदेतील तालुक्‍यातील लोकप्रतिनिधींना सूचना देऊन त्याचा पाठपुरावा करण्याची सूचना केली होती. त्यानुसार येथील लोकप्रतिनिधींनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या बांधकाम विभागाशी सातत्याने संवाद साधल्याने ३० ऑगस्टपासून ही लाँच सुरू झाली होती.

चालकाची मुदतही संपणार
ऑक्‍टोबर महिन्याच्या अखेर या लाँचवरील चालकाची मुदत संपणार आहे. त्यामुळे नवीन चालकही तातडीने मिळावा. अन्यथा, डिझेल मिळाले आणि चालक गेला अशी परिस्थिती निर्माण होईल. तसे झाल्यास चालकाअभावी पुन्हा लाँच बंद होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com