देशात 'जनता कर्फ्यू'; पण पुणे जिल्ह्यात...

टीम ई-सकाळ
रविवार, 22 मार्च 2020

जनता कर्फ्यूमुळे अखेर वाल्हेकर थंडावले 

भिगवणमध्ये शंभर टक्के प्रतिसाद

पुणे : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतातही रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'जनता कर्फ्यू'ची घोषणा केली. त्यानुसार देशातील विविध राज्यात हा कर्फ्यू पाळला जात आहे. पुण्यातील सर्व ठिकाणी कर्फ्यूला मोठा पाठिंबा दिला जात आहे. 

पुणे जिल्ह्यातील परिस्थिती काय?

जनता कर्फ्यूमुळे अखेर वाल्हेकर थंडावले 

जनता कर्फ्यूला कोरोनाशी दोन हात करण्यासाठी वाल्हे येथे शंभर टक्के प्रतिसाद मिळाला आहे. सकाळी सात वाजल्यापासून ही संपूर्ण वाल्हे बंद असून, रस्त्यावर एकही व्यक्ती किंवा वाहन दिसत नाही. एसटी स्टँड मुख्य बाजारपेठसह इतर ठिकाणी पूर्णपणे शांतता आहे. कोणीही आज घराबाहेर पडले नाही. यामुळे रस्ते ओस पडलेले आहेत.

Image may contain: outdoor

आळेफाटा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद

आळेफाटा (ता. जुन्नर) येथे लोकांनी घरात थांबण्याला विशेष महत्व दिल्याचे चित्र दिसून येत आहे. तर बेल्हे परिसरातही रस्त्यावर चिटपाखरूही दिसत नाही, अशी परिस्थिती आहे. आळेफाटा येथे पुणे - नाशिक महामार्ग व कल्याण - नगर महामार्ग एकत्र येत असून, ही जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील महत्वाची मोठी बाजारपेठ आहे. मात्र, परिसरात नेहमी असणारी वाहनांची वर्दळही सकाळपासून थांबल्याचे चित्र दिसून येत आहे.

Image may contain: sky, house, tree and outdoor

आळेफाटा परिसरात नेहमी असणारी माणसांची वर्दळ थांबल्याने, बाजारपेठेत पूर्ण शुकशुकाट आहे. आळे, राजुरी, बेल्हे परिसरातही रस्ते निर्मनुष्य असून, जनता कर्फ्यूला शंभर टक्के प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

भिगवणमध्ये शंभर टक्के प्रतिसाद

भिगवण शहरातील नागरिकांनी दवाखाने व मेडिकल दुकाने वगळता इतर सर्व व्यवयाय बंद ठेवून व घरातच थांबून शंभर टक्के प्रतिसाद दिला. पेठेतच नव्हे तर संपूर्ण गावातील रस्तेही निर्मनुष्य होते. काही आपतकालीन वाहनांचा अपवाद वगळता राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकही शंभर टक्के बंद होती.

Image may contain: people walking and outdoor

इंदापुर तालुक्यातील मोठी बाजारपेठ म्हणून भिगवणची बाजारपेठ ओळखली जाते. रविवारी भिगवणचा आठवडे बाजार असतो परंतु प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे तंतोतत पालन करत आठवडे, बाजार मासळी बाजार, कृषी उत्पन्न बाजार समिती, बस स्थानक, मुख्य पेठ, मदनवाडी चौफुला आदी ठिकाणी सामसूम होते. 

मंचरमध्ये शंभर टक्के प्रतिसाद

मंचरमध्ये शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. पुणे-नाशिक रस्त्यावर व शहरांमध्ये शुकशुकाट होता. विनाकारण रस्त्यावर येणार्‍यांना मंचर पोलिसांनी उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. रात्री नऊपर्यंत कामाशिवाय रिकामटेकडे फिरणाऱ्यांना पोलिसांच्या शिक्षेला सामोरे जावे लागेल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. पुणे-नाशिक रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या तुरळक वाहनांचीही ही पोलिस कसून चौकशी करत होते.

Image may contain: sky and outdoor


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Various places of Pune District giving Good Response to Janata Curfew