वरसगाव धरण 100 टक्के भरले

राजेंद्रकृष्ण कापसे
रविवार, 4 ऑगस्ट 2019

खडकवासला, पानशेत धरणापाठोपाठ वरसगाव धरण देखील आज रविवारी सकाळी 10 वाजता १०० टक्के भरले आहे. परिणामी, या धरणातून सध्या 13 हजार क्यूसेक सोडला जात आहे. 

खडकवासला : खडकवासला, पानशेत धरणापाठोपाठ वरसगाव धरण देखील आज रविवारी सकाळी 10 वाजता १०० टक्के भरले आहे. परिणामी, या धरणातून सध्या 13 हजार क्यूसेक सोडला जात आहे. 

वरसगाव धरण मोसे नदीवर बांधले असून त्याची क्षमता 12.82 टीएमसी आहे. तर 28 जून 2019 ला 0.60 टीएमसी म्हणजे 4.71 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. त्यानंतर 38 दिवसात दोन हजार 198 मिलीमीटर पाऊस पडल्यानंतर या धरणात 12.22 टीएमसी म्हणजे 95.29 टक्के पाणीसाठा जमा झाल्यावर धरण 100 टक्के भरले  असे प्रभारी उपअभियंता राजकुमार क्षीरसागर यांनी माहिती देतानां सांगितले. 

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत पावसाची जोरदार हजेरी सुरू आहे. पावसाची संततधार अशीच सुरु राहिली तर, टेमघर धरण देखील संध्याकाळपर्यंत पूर्ण भरण्याची शक्यता जलसंपदा विभागाने वर्तविली आहे. या चारही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. म्हणून मुठा नदी पात्रालगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मागील आठवडाभरापासून धरण क्षेत्रांमध्ये पावसाची संततधार सुरू असल्याने पानशेत, खडकवासला ही धरणे शंभर टक्के भरली. शनिवारपर्यंत वरसगाव धरण ९३ टक्के भरले होते. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रात्रभर मुसळधार पावसामुळे रविवारी सकाळी १० वाजता धरण शंभर टक्के भरले आहे. पानशेत धरणातून पाण्याचा  9 हजारचा क्यूसेक विसर्ग सुरू असताना आता वरसगाव धरणातून 13 हजार क्यूसेकचा सोडला आहे.  

टेमघर धरणातून सुमारे 1000 क्यूसेकच विसर्ग सुरू आहे. असे मिळून 23 हजार क्यूसेक पाणी खडकवासला धरणात थेट जमा होत आहे. तसेच या व्यतिरिक्त खडकवासला धरणात पाणी जास्त जमा होत असल्याने खडकवासला धरणातून 41 हजार 624 क्यूसेकचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा जलसंपदा विभागाकडून दिला जात आहे. त्याच बरोबर, महापालिका, आपत्ती व्यवस्थापन विभाग, पुणे शहर व वाहतूक पोलिस अग्निशमन यंत्रणा यासाठी काम करीत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Varsgaon dam is 100 percent filled