मनसे नेते वसंत मोरेंचे थेट एकनाथ शिंदेंना पत्र! केली 'ही' मागणी -Vasant More | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vasant More

Vasant More : मनसे नेते वसंत मोरेंचे थेट एकनाथ शिंदेंना पत्र! केली 'ही' मागणी

मनसे नेते वसंत मोरे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहले आहे. नदीकाठ सुधार प्रकल्पाच्या अंतर्गत मुळा मुठा नदीपात्र परिसरातील वृक्ष तोडी संदर्भात त्यांनी हे पत्र लिहिले आहे. या वृक्षतोडीला मनसेचा विरोध केला आहे.

या प्रकल्पाअंतर्गत सहा हजाराहून अधिक झाडे तोडली जाणार आहेत. यालाच मनसेने विरोध केला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यामध्ये लक्ष घालावे, अशी मागणी केली आहे

नदीकाठ सुधार प्रकल्पाला वृक्ष तोड थांबवून पर्यायी व्यवस्था शोधावी, असे वसंत मोरे यांनी पत्रात म्हटले आहे. तसेच या विषयी वसंत मोरे यांनी पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना भेटून निवेदनही दिले आहे. 

पत्रात काय म्हणाले वसंत मोरे - 

पुणे मनपाच्या नदीकाठ सुधार प्रकल्पाच्या पहिल्या दोन टप्प्यातील कामासाठी सुमारे ६००० (सहा हजार) वृक्षांची कत्तल करण्यात येणार आहे. तसेच यातील ९० % वृक्ष हे देशी जातीचे आहेत असे समजते. पैकी ३२४९ वृक्ष पूर्णपणे काढण्याचा व २८१३ वृक्ष काढून त्यांचे पुनर्नरोपण करण्याचा प्रस्ताव पुणे मनपानेच वृक्ष संवर्धन समितीसमोर मंजुरीसाठी ठेवल्याचे समजते. वृक्ष पुनर्रोपण झाल्यानंतर ते १००% यशस्वी होत नाही हा अनुभव आहे. 

पुणे शहरातील सालीम अली पक्षी अभयारण्य आणि नाईक बेट हे पक्षांचे नैसर्गिक अधिवास आहेत. या परिसरातील वृक्षतोड या संपुर्ण भागातील जैव विविधतेवर आणि पर्यावरणावर विपरीत परिणाम करणारी ठरणार आहे. तसेच २०० पेक्षा जास्त झाडांची वृक्षतोड करण्यासाठी राज्य पर्यावरण विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेना म्हणून आमचा विधायक प्रकल्पांना कधीच विरोध नाही परंतु पर्यावरण, जैव विविधता आणि लोकहिताचे नुकसान करणाऱ्या प्रकल्पांची पाठराखण महाराष्ट्र नवनिर्माण सेना कधीही करणार नाही. त्यामुळे आपणांस आम्ही या पत्राद्वारे विनंती करू इच्छितो की या प्रस्तावित वृक्षतोडीच्या विषयात आपण पर्यावरण आणि जैव विविधतेचा विचार करून लक्ष घालावे व ही वृक्षतोड थांबवावी व पर्यायी व्यवस्था शोधण्याचे आदेश पुणे मनपाला द्यावेत, ही नम्र विनंती आपण या संपूर्ण विषयात लक्ष घालून सकारात्मक निर्णय घ्याल असा आम्हाला एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी आणि पुणेकर म्हणून विश्वास आहे, वसंत मोरे यांनी पत्रात म्हटले आहे.