#Vasantotsav स्वर, तालाच्या वैभवात नटला वसंतोत्सव

#Vasantotsav स्वर, तालाच्या वैभवात नटला वसंतोत्सव

पुणे - ‘वक्रतुंड नररुंडमालधर’ ही नांदी ऑर्गनवर वाजू लागली आणि वसंतोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचीही आगळीवेगळी नांदी झाली. बासरीवर ‘मोगरा फुलला,’ सतारीवर ‘तोच चंद्रमा नभात’ प्रकटला. व्हायोलिन ‘का रे दुरावा,’ गाऊ लागली. हा सारा जबरदस्त अनुभव चाळीस वादकांनी मराठी गीतांच्या सिंफनीकरणातून दिला. प्रसिद्ध संगीत संयोजक कमलेश भडकमकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘सप्तशतक’ या अभूतपूर्व प्रयोगातून सातशे वर्षांच्या मराठी गीत परंपरेला कवेत घ्यायचा प्रयत्न केला. पु. लं. वर चित्रित झालेलं ‘इथेच टाका तंबू’पाठोपाठ गीतांची रंजक मालिका झाली.

‘वसंतोत्सवा’अधिक बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
#Vasantotsav मराठी गीत परंपरेचा सांगीतिक पट

#Vasantotsav आठ वर्षांनंतर अमेय पुन्हा संगीत नाटकात

व्हायोलिनच्या ताफ्यासह मेंडोलिन, सतार, बासरी, सनई, सॅक्‍सोफोन, क्‍लॅरोनेट, ॲकॉर्डियन, गिटार, तबला, ढोलकी, डफ, ड्रम्स, ऑक्‍टोपॅड, कीबोर्ड आदी भारतीय व पाश्‍चात्त्य वाद्यांच्या मांदियाळीत एकेक गीत शब्दांशिवाय अवतरत होतं. अभिनेत्री स्पृहा जोशीच्या निवेदनामुळे या गीतांबद्दलची उत्सुकता वाढत गेली. वसंतराव देशपांडे यांना मानवंदना देण्यासाठी खास त्यांची गीतेही बगळ्यांच्या माळेसारखीच फुलत गेली.

‘थ्री जी बाय विक्कू विनायकराम’ या कार्यक्रमातून विक्कू विनायकराम (आजोबा), सेल्वा गणेश (पुत्र) व एस. स्वामिनाथन्‌ (नातू) या तीन पिढ्यांनी कलेचा जपलेला वारसा प्रभावित करून गेला. त्यांना ए. गणेश (मोरसिंग) यांनी साथ केली. शिवतांडवनंतर त्यांनी गुरुवंदनम्‌ सादर केले. मातीच्या घड्यावर आघात करून निरनिराळे ताल प्रस्तुत करणे विस्मयचकित करणारे होते. या मंडळींनी श्रोत्यांना टाळी वाजवण्यासाठी मात्रा शिकवून त्यांनाही वादनात सामील करून घेतले. अवघा मंडप तालवैविध्याने थरारून गेला. खंजिरा व तोंडात धरून वाजवले जाणारे मोरसिंग हे दक्षिणी परंपरेतील वाद्य आणि मुखाने अतिजलद बोलांची केलेली लयबद्ध आवर्तने तसेच एकल व सामुदायिक आविष्काराची रंजक नादमय गुंफण सामूहिक भावसमाधीचा प्रत्यय देणारी ठरली. सेल्वा व स्वामिनाथन्‌ यांनी रेल्वेची मजेशीर सफर खंजिरावादनातून घडवली. 

डॉ. वसंतराव देशपांडे यांना स्वरांजली अर्पण करण्यासाठी आयोजित वसंतोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची भावमधुर सांगता, आयोजक व त्यांचा नातू असलेल्या राहुल देशपांडे यांच्या  गायनाने झाली. 

मालकंसमधील बंदिशी सादर करताना राहुल म्हणाले, ‘‘मी गाणार असलेल्या, पंडित कुमार गंधर्व यांच्या तीन बंदिशींमधील त्यांची ‘कहन’ आणि बांधणी इतकी सुंदर आहे की, त्याला फारसा धक्का न लावता गाण्याचा प्रयत्न करणार आहे.’ ‘आये हो जी,’ (विलंबित), ’छब तेरी’ (मध्य लय) या बंदिशी त्यांनी ठहरावयुक्त पेश केल्या. यानंतर बसंत व सोवनीचा मिलाफ असलेली कुमारजींचीच रचना राहुल यांनी प्रस्तुत केली. नंतर ‘या भवनातील गीत पुराणे’ हे नाट्यगीत ते उत्कटतेने गायले. नंतर ’ सांवरे अइजइहो’ गाताना त्यांनी पुन्हा आजोबांची आठवण जागवली. त्यांचे ‘दिल की तपिश’ ऐकताना किरवाणीच्या सुरांवर हिंदोळे घ्यायची मौज अनुभवता आली. त्यांना निखिल फाटक (तबला), आदित्य ओक (हार्मोनियम) यांनी साथ केली.

आज वसंतोत्सवात
  आदित्य ओक आणि सत्यजित प्रभू यांचे ‘जादूची पेटी’ हा अनोखा आविष्कार
  आदर्श शिंदे : मराठी लोकसंगीत सादरीकरण
  संगीत नाटक : संगीत संशय कल्लोळ (सादरकर्ते : राहुल देशपांडे,  प्रियांका बर्वे, अमेय वाघ आणि दीप्ती माटे)

शास्त्रीय संगीत गायक ओळख हवी
राहुल म्हणाले, ‘‘वसंतराव देशपांडे हे अतिशय उत्तम शास्त्रीय संगीत गाणारे, जाणणारे होते. त्यासोबतच उपशास्त्रीय व नाट्यसंगीतही तेवढेच उत्तम ते गात असत. पण त्यांच्यावर नाट्यसंगीत गाणारा असा शिक्का दुर्दैवाने बसला. मीही शास्त्रीय संगीत व गझल, नाट्यगीत वगैरे दुसरेही प्रकार गातो. शास्त्रीय संगीत गाणारा एक बरा गायक अशी माझी ओळख व्हावी हीच इच्छा आहे.’’ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com