‘वस्ती क्‍लिनिक’ औषधालाही नाही

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 डिसेंबर 2018

पुणे - झोपडपट्ट्यांतील रहिवाशांना तत्पर आरोग्य सेवा पुरविण्याच्या उद्देशाने महापालिकेच्या आरोग्य खात्याने आखलेली ‘वस्ती क्‍लिनिक’ योजना गुंडाळण्यात आली आहे. यामागे योजनेचा उर्वरित निधी अन्यत्र वळविल्याचे कारण आरोग्य खात्याकडून दिले जात आहे. १८ वस्त्यांमध्ये ही योजना नियोजित असताना दोन- तीन ठिकाणीच ती राबवण्यात आली. या योजनेकरिता कंत्राटी डॉक्‍टरांची नेमणूक करण्यासही प्रशासनाला सवड मिळालेली नाही. 

पुणे - झोपडपट्ट्यांतील रहिवाशांना तत्पर आरोग्य सेवा पुरविण्याच्या उद्देशाने महापालिकेच्या आरोग्य खात्याने आखलेली ‘वस्ती क्‍लिनिक’ योजना गुंडाळण्यात आली आहे. यामागे योजनेचा उर्वरित निधी अन्यत्र वळविल्याचे कारण आरोग्य खात्याकडून दिले जात आहे. १८ वस्त्यांमध्ये ही योजना नियोजित असताना दोन- तीन ठिकाणीच ती राबवण्यात आली. या योजनेकरिता कंत्राटी डॉक्‍टरांची नेमणूक करण्यासही प्रशासनाला सवड मिळालेली नाही. 

‘वस्ती क्‍लिनिक’साठी पाच कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. निधी हातात पडताच दोन- चार कंत्राटी डाक्‍टरांची नेमणूक करण्यात आली. मात्र, गरिबांच्या आरोग्यासाठीची ही योजना आता औषधापुरतीही शिल्लक राहिली नसल्याचे स्पष्ट झाले असून, ती का बंद झाली, याचे उत्तर आरोग्य खाते द्यायला तयार नाही. झोपडपट्टीतील रहिवासी बोगस डॉक्‍टरांचे बळी ठरू नयेत आणि त्यांना आरोग्य सेवा-सुविधा मिळाव्यात, याकरिता राबविलेली ‘वस्ती क्‍लिनिक’ची संकल्पना आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांमुळेच बंद पडल्याचे समोर आले आहे. 

पुणे शहर आणि परिसरातील सुमारे ४० टक्के लोकसंख्या झोपडपट्टीत राहते. सध्याच्या लोकसंख्येनुसार ही संख्या १२ लाखांपर्यंत आहे. अशा भागांत बोगस डॉक्‍टरांनी आपले बस्तान बसविले. त्यावर महापालिका आणि संबंधित यंत्रणांनी कारवाई केली. त्यानंतर मात्र, येथील रहिवाशांसाठी स्वतंत्र क्‍लिनिकची योजना आकाराला आणली. स्थायी समितीच्या अध्यक्षांसह प्रशासनाने तिचा गाजावाजा केला. पहिल्यांदाच अशी योजना आखल्याचे दाखवत आपली पाठ थोपटून घेतली. लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याचे सांगून हवा तेवढा निधी घेतला. मात्र आर्थिक गणितांपुढे आरोग्याचा प्रश्‍न दुर्लक्षित राहिला आणि योजना फसली. मात्र, ती सुरूच असल्याचा दावा करण्यात आला. तेव्हा ज्या प्रभागांमध्ये झोपडपट्ट्या आहेत, तेथील नगरसेवकांशी चर्चा केली तेव्हा प्रशासनाचा चेहरा उघड झाला.
 
काय आहे योजना? 
झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांसाठी वस्ती पातळीवर बाह्य रुग्ण सेवा देण्यासाठी ही योजना राबविण्यात आली. आठवड्यात तीन दिवस त्या-त्या झोपडपट्ट्यांमध्ये ही सेवा उपलब्ध करून देण्याचे नियोजन होते. महापालिकेकडे डॉक्‍टर आणि कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने या योजनेसाठी कंत्राटी पद्धतीने डॉक्‍टरांची नेमणूक करण्याचा निर्णय झाला.

त्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. मात्र, योजना राबवायचीच नाही, हे ठरविलेल्या आरोग्य खात्याने साधे डॉक्‍टरही नेमले नाहीत. आपल्याकडील काही डॉक्‍टरांच्या उपस्थितीत योजनेचा प्रारंभ केला, त्याचे फोटेसेशनही झाले. त्यानंतर मात्र, एकाही झोपडपट्टीत ‘वस्ती क्‍लिनिक’ दिसले नाही.   

लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ज्या योजना महत्त्वाच्या आहेत, त्यांची अंमलबजावणी होईल. त्यासाठी निधी देण्यात येणार आहे. मात्र, अधिकारी- कर्मचाऱ्यांमुळे योजना रखडणार नाहीत, याकडे गांभीर्याने लक्ष दिले जाईल. ‘वस्ती क्‍लिनिक’ची योजना नव्याने सुरू करण्यात येईल. 
- डॉ. रामचंद्र हंकारे, आरोग्यप्रमुख, महापालिका

Web Title: Vasti Clinic Medicine Doctor Municipal