प्रतिष्ठेचा वसुंधरा पुरस्कार प्रवीण निकम यांना

मिलिंद संगई
रविवार, 11 मार्च 2018

पर्यावरण व सामाजिक क्षेत्रात राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणा-या व्यक्तीस दरवर्षी वसुंधरा पुरस्कार प्रदान केला जातो. प्रवीण निकम यांनी मासिक पाळीबाबत समाजाच्या सर्व स्तरात जागृतीचे महत्वाचे काम केले आहे. लैंगिक शिक्षण व मासिक पाळी या बाबत ते मोकळेपणाने विचार मांडतात आणि त्यांच्या या कामाची दखल सर्वच पातळ्यांवर घेतली गेली आहे

बारामती - येथील एन्व्हॉर्यमेटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा वसुंधरा पुरस्कार यंदा मासिक पाळी या विषयामध्ये महिलांसोबतच पुरुषांचेही प्रबोधन करणारे रोशनी या सेवाभावी संस्थेचे प्रमुख प्रवीण निकम यांना प्रदान केला जाणार आहे. स्मृतीचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे. फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी ही माहिती दिली. 

पर्यावरण व सामाजिक क्षेत्रात राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणा-या व्यक्तीस दरवर्षी वसुंधरा पुरस्कार प्रदान केला जातो. प्रवीण निकम यांनी मासिक पाळीबाबत समाजाच्या सर्व स्तरात जागृतीचे महत्वाचे काम केले आहे. लैंगिक शिक्षण व मासिक पाळी या बाबत ते मोकळेपणाने विचार मांडतात आणि त्यांच्या या कामाची दखल सर्वच पातळ्यांवर घेतली गेली आहे. या विषयातील चळवळ वाढविण्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अत्यंत कमी वयात या विषयात वेगळे ठसा उमटविणारे काम त्यांनी केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार असल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. सन 2016 मध्ये त्यांना राष्ट्रीय युवा सन्मान तसेच युनायटेड नेशन्सचे जागतिक युवा अँबेसिडर म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. 

दरम्यान अभिनयाच्या क्षेत्रात ठसा उमटविणारे सिंघमफेम अशोक समर्थ, बारामतीच्या महिला ग्रामीण रुग्णालयाचा नावलौलीक वाढविणारे डॉ. बापू भोई, प्लॅस्टिकमुक्तीसाठी सातत्याने प्रयत्न करणा-या डॉ. वर्षा सिधये, कुस्तीमध्ये बारामतीचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारा कुस्तीपटू उत्कर्ष काळे,  वृक्षसंगोपनाचा वसा घेतलेले कृष्णराव कदम, झुंबा नृत्य प्रकारात लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये बारामतीचे नाव पोहोचविणारा अमर निकम या सहा जणांना बारामती आयकॉन पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. बुधवारी (ता. 14) चिराग गार्डन येथे संध्याकाळी साडेपाच वाजता फोरमचा वर्धापनदिन सोहळा संपन्न होणार आहे. त्या प्रसंगी हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. या अगोदर डॉ. हेमा साने, भारत भूषण, प्रकाश गोळे, सुमन मोरे, किरण पुरंदरे, बैजू पाटील, नीलीमकुमार खैरे या मान्यवरांना वसुंधरा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

Web Title: vasundhara award pune news